संगीत भूषण पं. राम मराठे स्मृती समारोहास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। - ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणारा 31 वा संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोह 27 ते 29 नोव्हेंबर 2026 या कालावधीत राम गणेश गडकरी रंगायतन येथे संपन्न होणा
ठाणे


ठाणे, 22 नोव्हेंबर (हिं.स.)। - ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आणि अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणारा 31 वा संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोह 27 ते 29 नोव्हेंबर 2026 या कालावधीत राम गणेश गडकरी रंगायतन येथे संपन्न होणार आहे. या तीन दिवसीय सांगीतिक पर्वणीच्या प्रवेशिका मिळविण्यासाठी आज (२२ नोव्हेंबर ) सकाळपासूनच राम गणेश गडकरी रंगायतन येथे रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

यंदाचा संगीतभूषण पं. राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ संगीत कलाकार पं. शैलेश भागवत यांना प्रदान करण्यात येणार आहे. 51 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर युवा पुरस्काराने हेमा उपासनी यांना गौरविण्यात येणार आहे.

समारोहाची सुरुवात शुक्रवारी 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 8.00 वाजता श्रुती मराठे यांच्या गायनाने होणार आहे. त्यानंतर रात्री 8.30 वाजता पद्मविभूषण डॉ. एन. राजम यांचे व्हायोलिनवादन रसिकांना अनुभवता येणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील ज्येष्ठ आणि मान्यवर कलाकारांच्या सादरीकरणामुळे पहिल्याच दिवशी समारोहाची सुरेल सुरुवात होणार आहे.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 3.30 वाजता भरत नाट्यमंदिर, पुणे यांच्यातर्फे 'बंध रेशमाचे' या संगीत नाटकाचे सादरीकरण होणार आहे. सायंकाळी 8 वाजता वेदश्री खाडीलकर ओक आणि आदित्य ओक 'आशाताई एक सूरदासी' हा विशेष सांगीतिक कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यानंतर रात्री 9.30 वाजता गायिका सावनी शेंडे यांच्या गायनाने दुसऱ्या दिवसाची सांगता होईल.

समारोहाच्या तिसऱ्या दिवशी 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या समग्र गायकीचा अनुभव देणारा 'स्वरानुभूती' हा विशेष कार्यक्रम विदुषी नंदिनी बेडेकर आणि त्यांच्या शिष्या सादर करणार आहेत.

सायंकाळी 4.00 वाजता यती भागवत आणि स्वप्नील भिसे यांचे तबला सहवादन होणार आहे. सायंकाळी 5.00 वाजता गायन, वादन आणि नृत्य यांचा सुरेख संगम असलेला 'अनुभूती' हा कार्यक्रम पं. मुकुंदराज देव सादर करणार आहेत. सायंकाळी 7.00 वाजता ओंकार दादरकर यांचे गायन होणार असून, रात्री 8.30 वाजता पं. गिरीष संझगिरी यांचे गायन रसिकांना ऐकता येणार आहे. रात्री 10.00 वाजता पं. सुहास व्यास यांच्या गायनाने या तीन दिवसीय संगीत समारोहाची सांगता होणार आहे. हा संपूर्ण समारोह विनामूल्य असून कार्यक्रमाच्या प्रवेशिका 22 नोव्हेंबर 2026 पासून राम गणेश गडकरी रंगायतन येथे उपलब्ध आहेत. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असून मान्यवरांसाठी पहिल्या पाच रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande