
मुंबई, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला 'रामायण' हा चित्रपट आपल्या भव्य निर्मिती आणि कलाकारांसोबतच संगीतामुळेही चर्चेत आहे. चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी ऑस्कर विजेते संगीतकार ए. आर. रहमान आणि हंस झिमर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
रहमान यांनी नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला की, 'रामायण'च्या संगीतावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी जवळपास १० ते १२ चित्रपटांच्या संगीताचे प्रस्ताव नाकारले होते. या चित्रपटासाठी आपला संपूर्ण वेळ आणि सर्जनशील ऊर्जा द्यायची होती, असे त्यांनी सांगितले.
रहमान यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून ते चित्रपटाचे संगीत, मुख्य संगीतधून आणि इतर धुनांवर काम करत आहेत. या काळात अनेक रचनांच्या १२ ते १३ वेगवेगळ्या आवृत्त्या तयार करण्यात आल्या. 'रावण तांडव'च्या संगीतधुनेवरही अनेक वेळा काम करण्यात आले. अखेरीस सर्वांना आवडेल अशी संगीतधून तयार करण्यात यश आले. रहमान यांच्या मते, ही संपूर्ण प्रक्रिया त्यांच्यासाठी अत्यंत सुंदर अनुभव ठरली.
अनेक मोठ्या चित्रपट निर्मात्यांसोबत काम करण्याचे प्रस्ताव नाकारल्यानंतरही आपल्याला या निर्णयाचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. एखादा प्रकल्प आपल्या सर्जनशील विचारांशी जुळत असेल, तरच आपण तो स्वीकारतो, असेही रहमान यांनी स्पष्ट केले.
'रामायण : भाग १' या चित्रपटाच्या संगीत अल्बममध्ये 'जय जय राम', 'रावण तांडव' आणि 'सीताज ॲस्पिरेशन' यांसारख्या गाण्यांचा समावेश आहे. 'जय जय राम' हे गाणे अरिजित सिंह आणि श्रेया घोषाल यांनी गायले आहे, तर 'रावण तांडव'ला विशाल ददलानी यांनी आवाज दिला आहे. 'सीताज ॲस्पिरेशन' या गाण्यात ए. आर. अमीन, वैशाली सामंत, रक्षित सुरेश आणि अंतरा नंदी यांच्या आवाजांचा समावेश आहे. या गाण्यांचे शब्द कवी कुमार विश्वास यांनी लिहिले आहेत. या संगीत अल्बममध्ये 'जय जय राम'ची वाद्यवृंद आवृत्ती आणि 'राम थीम' यांचाही समावेश आहे. ही संगीतधून ए. आर. रहमान आणि हंस झिमर यांनी संयुक्तपणे तयार केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule