
मुंबई, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। मराठी चित्रपटसृष्टीत ग्रामीण जीवनाचा बाज, नात्यांमधील भावबंध, सामाजिक वास्तव आणि मनोरंजन यांची सुरेख सांगड घालणारा ‘अबीर’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गावाकडची संस्कृती, माणसांमधील नातेसंबंध, भावभावनांचे विविध पदर आणि कथानकातील नाट्यमय वळणे यांमधून चित्रपटाची कथा उलगडणार आहे. संगीत, नृत्य आणि मनोरंजनाची मेजवानी देतानाच भावनिक आशय मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता या सिनेमाचा टिझर प्रदर्शित झाला असून, तो प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे. ‘अबीर’ हा चित्रपट येत्या १८ डिसेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
सुदेश वसंतराव झावरे पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, शंभो एंटरटेनमेंट आणि श्री महाकाल प्रॉडक्शन्स यांनी चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. आकाश विष्णू शिंदे यांनी चित्रपटाचे लेखन, पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन केले आहे. प्रदर्शित झालेल्या टिझरमधून चित्रपटातील व्यक्तिरेखा, कथानकाचा ग्रामीण बाज आणि त्यातील नाट्यमय प्रसंगांची झलक पाहायला मिळते. निसर्गरम्य ग्रामीण परिसर, शांतपणे वाहणारी नदी, नारळी-पोफळीच्या बागा आणि गावाकडच्या जीवनशैलीचे मनोहारी दर्शन घडवत ‘अबीर’चा टिझर सुरू होतो. नदीच्या काठावरून सुरू होणारा प्रवास, नावेतून होणारी सफर, गावातील माणसांची वर्दळ आणि विविध व्यक्तिरेखांची ओळख यातून एका ग्रामीण विश्वाची हळुवार उकल होत जाते. मात्र, या निसर्गरम्य वातावरणाच्या आड दडलेले भावनिक संघर्ष आणि नाट्यमय घडामोडींचे संकेतही टिझरमधून मिळतात.
पंढरीचा विठ्ठल आणि जीवनात येणारी संकटे यांची सुरेख सांगड सिनेमात पाहायला मिळणार आहे. गावातील मंदिर, देवपूजेचे प्रसंग, आरतीचा प्रकाश आणि रात्रीच्या अंधारात कंदिलाच्या उजेडात दिसणारी स्त्रीची अस्वस्थ मुद्रा या दृश्यांमधून चित्रपटाच्या कथेला एक गूढ आणि भावस्पर्शी किनार लाभते. एका बाजूला निसर्गाचे लोभस सौंदर्य, तर दुसरीकडे मानवी नात्यांमधील गुंतागुंत, श्रद्धा, भावभावना आणि संघर्ष यांचे सूचक दर्शन टिझरमध्ये घडते. वेगवान दृश्यांची सरमिसळ न करता वातावरणनिर्मितीवर दिलेला भर, प्रभावी दृश्यभाषा आणि पार्श्वसंगीताची साथ यांमुळे टिझरमध्ये एक वेगळीच खिळवून ठेवणारी अनुभूती मिळते. कथानकातील नेमके रहस्य उलगडण्याऐवजी उत्सुकता ताणून धरणारा हा टिझर ‘अबीर’च्या वेगळ्या आशयाची चाहूल देतो. टिझरमधील प्रसंगरचना, संवाद आणि दृश्यात्मक मांडणी यांमुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
निर्माते सुदेश वसंतराव झावरे पाटील म्हणाले, “‘अबीर’ हा केवळ चित्रपट नसून, माणसाच्या अंतर्मनातील सौंदर्य, श्रद्धा आणि माणुसकीचा शोध घेणारा भावप्रवास आहे. पंढरीच्या विठुरायाच्या चरणी लीन होणारा वारकरी संप्रदाय समतेचा, प्रेमाचा आणि माणुसकीचा संदेश देतो. हाच विचार ‘अबीर’च्या आशयाशी नाते सांगणारा आहे. वर्णभेदाच्या पलीकडे जाऊन माणसातील संस्कार आणि अंतःसौंदर्य ओळखण्याचा संदेश ग्रामीण भागातील रसिकांपासून वारकरी बांधवांपर्यंत सर्वांच्या मनाला भावेल, असा आम्हाला विश्वास आहे. विठ्ठलभक्तीतील समतेचा हाच गंध ‘अबीर’च्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा, हीच आमची मनापासूनची इच्छा आहे.”
टिझरबाबत दिग्दर्शक आकाश विष्णू शिंदे म्हणाले की, ‘अबीर’ ही केवळ एका गावाची किंवा काही माणसांची गोष्ट नाही, तर माणसांच्या मनात दडलेल्या भावभावनांचा आणि नात्यांच्या विविध रंगांचा प्रवास आहे. ग्रामीण मातीचा सुगंध, तिथली संस्कृती, श्रद्धा आणि माणसांमधील भावबंध यांचे प्रामाणिक चित्रण करण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातील प्रत्येक सीनची निवड, व्यक्तिरेखांची मांडणी, संवाद, दृश्यांची रचना आणि कॅमेऱ्याच्या प्रत्येक फ्रेममागे त्यांचा बारकाईने केलेला विचार दिसून येईल. लेखन असो किंवा दिग्दर्शन, प्रत्येक गोष्टीकडे ते केवळ तांत्रिक दृष्टिकोनातून न पाहता, प्रेक्षकांना त्या प्रसंगाची अनुभूती कशी देता येईल याचा विचार केला आहे. टिझरमधून चित्रपटाच्या विश्वाची केवळ एक झलक दाखवली आहे; त्यामागील भावनिक पदर आणि कथानकातील अनपेक्षित वळणे प्रेक्षकांना चित्रपटात अनुभवायला मिळतील. प्रेक्षकांनी ‘अबीर’च्या या रंगीबेरंगी, भावस्पर्शी आणि उत्कंठावर्धक प्रवासाला मनापासून साथ द्यावी, हीच अपेक्षा आहे.
पायल जाधव, निखिल चव्हाण, देविका दफ्तरदार, अविनाश नारकर, गणेश देशमुख, प्राजक्ता हनमघर, गार्गी फुले, यश डिंबळे, रोशन सुनील राऊत, प्रशांत नेटके, गायत्री सुदेश झावरे, रेखा दहातोंडे, राजवर्धन झावरे आणि साईराज केंद्रे यांच्या चित्रपटात भूमिका आहेत. अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनीही विशेष भूमिका साकारली आहे. निशांत भागवत यांनी छायांकन केले असून, अमित खंडागळे आणि सचिन नागरे यांनी सहदिग्दर्शन केले आहे. निलेश गावंड यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. रोहित नागभिडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले असून, आर्या आंबेकर, वैशाली माडे आणि राधा खुडे यांनी गीतांना स्वर दिला आहे. सुजित सुरवसे यांनी रंगभूषा, स्नेहल नार्वेकर यांनी वेशभूषा, महेश गोरे यांनी कला दिग्दर्शन, विकास खंदारे यांनी ध्वनी संयोजन आणि स्वरूप जोशी यांनी ध्वनी संकलन केले आहे. विष्णू घोरपडे यांनी प्रॉडक्शनची जबाबदारी सांभाळली आहे. मंगेश भिमराज जोंधळे हे कार्यकारी निर्माता (प्रसिद्धी आणि वितरण) असून, अभय वाव्हळ आणि युवराज कुमार इंगवले प्रोजेक्ट हेड आणि प्रतिभा चव्हाण लाईन प्रोड्युसर आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule