ब्रिटिश सत्तेला धडकी भरवणाऱ्या 'पत्री सरकार'ची गर्जना रुपेरी पडद्यावर
कोल्हापूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णपान आणि सातारा जिल्ह्यात ब्रिटिश सत्तेला समांतर शासन चालवून सळो की पळो करून सोडणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ऐतिहासिक लढ्यावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ हा भव्य ऐतिहासिक म
‘पत्री सरकार १९४२’ ऐतिहासिक मराठी चित्रपट


कोल्हापूर, 23 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्णपान आणि सातारा जिल्ह्यात ब्रिटिश सत्तेला समांतर शासन चालवून सळो की पळो करून सोडणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या ऐतिहासिक लढ्यावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ हा भव्य ऐतिहासिक मराठी चित्रपट शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

१९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनादरम्यान साताऱ्यात ब्रिटिश सत्तेविरुद्ध पुकारलेला अभूतपूर्व बंड, समांतर लोकशासनाची (प्रतिसरकार) स्थापना आणि क्रांतिकारकांचे असीम धैर्य या चित्रपटात प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा वारसा जपत स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रज राजवटीला कसे आव्हान दिले, याची प्रेरणादायी आणि अंगावर शहारे आणणारी गाथा प्रेक्षकांना या चित्रपटातून अनुभवायला मिळणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते उपेंद्र लिमये यांचा दमदार आवाज या चित्रपटाच्या कथानकाला अधिकच उंचीवर नेतो. चित्रपटात अनिल राबडे यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांची मध्यवर्ती भूमिका साकारली असून, त्यांच्यासोबत सिद्धार्थ बेदी, शुभम गवई रश्मी साळवी, अनुराधा धामणे, तृप्ती शेडगे, समीर पठाण, अक्षय हांडे, श्रेयस तांबे आणि ॲडम गिल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. विशेष म्हणजे, लोकप्रिय अभिनेता अंकित मोहन या चित्रपटात एका खास आणि लक्षवेधी भूमिकेत झळकणार आहे.

चित्रपटातील गाणी आणि संगीत हे या कलाकृतीचे मोठे आकर्षण ठरले आहे. चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन करणाऱ्या मनीष अनसुरकर यांनीच या चित्रपटाची गीते लिहिली असून संगीतही दिले आहे. नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपटाचे टायटल ट्रॅक आणि अंकित मोहन यांच्यावर चित्रित झालेले ऊर्जावान गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. विशाल जाधव, गोरख गुंजाळ, अनन्या नाईक आणि आनंद मेनन यांनी चित्रपटातील गाण्यांना आपला बुलंद आवाज दिला आहे. तर सौरभ लता शिवकुमार यांनी या ऐतिहासिक कथानकाला साजेसे प्रभावी पार्श्वसंगीत दिले आहे.

‘भागीरथी मोशन पिक्चर्स’च्या बॅनरखाली विशाल गोविंदराव जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, लेखन व दिग्दर्शनाची धुरा मनीष अनसुरकर यांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे छायांकन संदीप वाटवे, परमहंस पाठक आणि सुमेध मराठे यांनी केले असून संकलन अनिल मोकल यांचे आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील ज्वलंत इतिहास आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारा ‘पत्री सरकार १९४२’ हा चित्रपट २० नोव्हेंबरपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की पाहावा, असे आवाहन चित्रपटाच्या टीमतर्फे करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande