
रायगड, २४ नोव्हेंबर (हिं.स.) : ऑनलाइन फसवणुकीचे नवनवे प्रकार समोर येत असतानाच अलिबागमध्ये पैशांच्या दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून एका महिलेला तब्बल ५ लाख ३ हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. परदेशातून भारतात येण्यासाठी भारतीय चलनाची आवश्यकता असल्याचे भासवून अज्ञात सायबर भामट्यांनी व्हॉट्सॲप कॉलच्या माध्यमातून महिलेशी संपर्क साधला आणि तिचा विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक केली.अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात आरोपींनी संबंधित महिलेशी व्हॉट्सॲप कॉलद्वारे संपर्क साधत सुरुवातीला तिच्याशी ओळख निर्माण केली. त्यानंतर आपण परदेशातून भारतात येणार असून त्यासाठी भारतीय चलनाची आवश्यकता असल्याचे सांगितले. महिलेने पैसे दिल्यास ते दुप्पट करून परत देण्याचे आकर्षक आश्वासनही आरोपींनी दिले.
आरोपींच्या या आमिषाला बळी पडून महिलेने टप्प्याटप्प्याने ऑनलाइन माध्यमातून तसेच बँक खात्याद्वारे एकूण ५ लाख ३ हजार रुपये पाठवले. मात्र, पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी ठरल्याप्रमाणे रक्कम परत केली नाही. अशा प्रकारे महिलेची आर्थिक फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९७/२०२६ अन्वये माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० मधील कलम ६६(ड) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१८(४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक किशोर साळे पुढील तपास करीत आहेत.
सायबर भामट्यांच्या आमिषांना बळी पडू नका!
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना विशेष सतर्कता बाळगण्याची गरज आहे. अनोळखी व्यक्तींकडून व्हॉट्सॲप कॉल, मेसेज किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पैशांची मागणी झाल्यास त्याची सत्यता पडताळल्याशिवाय कोणताही व्यवहार करू नये.
पैसे दुप्पट करून देण्याचे आश्वासन, परदेशातून भेटवस्तू किंवा मोठी रक्कम पाठविण्याचे आमिष तसेच कस्टम शुल्क किंवा अन्य कारणांसाठी पैसे भरण्याची मागणी हे सायबर फसवणुकीचे संभाव्य प्रकार असू शकतात. त्यामुळे अशा प्रलोभनांना बळी पडू नये. आपली बँक खात्याची माहिती, एटीएम पिन, ओटीपी आणि यूपीआय पिन कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नये.
ऑनलाइन आर्थिक फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)