
लातूर, 24 नोव्हेंबर, (हिं.स.) देशसेवेबरोबरच आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातही भारताचा तिरंगा अभिमानाने उंचावणारे अहमदपूर तालुक्यातील मोहगावचे सुपुत्र, सैनिक धनराज शेषेराव सिरसाठ यांनी जागतिक स्तरावर दमदार कामगिरी केली आहे. जॉर्डनमधील अकाबा येथे आयोजित टेंट पेगिंग वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत त्यांनी भारतीय संघाला तीन कांस्यपदके मिळवून देत देशाचा गौरव वाढविला. त्यांच्या या यशाने मोहगावसह संपूर्ण परिसरात आनंदोत्सवाचे वातावरण निर्माण झाले.
जॉर्डन येथे झालेल्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत धनराज सिरसाठ यांनी वैयक्तिक प्रकारात दोन, तर सांघिक प्रकारात एक कांस्यपदक पटकावले. घोडेस्वारीतील कौशल्य, अचूक लक्ष्यभेद आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रतिभेची छाप उमटवली.
४ जानेवारी २०११ रोजी भारतीय सैन्यदलात दाखल झालेल्या धनराज सिरसाठ यांनी देशसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय यश मिळविले आहे. त्यांच्या नावावर आतापर्यंत एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदके अशी एकूण सात पदके जमा झाली आहेत.
जागतिक स्पर्धेत गावच्या सुपुत्राने भारताचा गौरव वाढविल्याची बातमी मोहगावमध्ये पोहोचताच ग्रामस्थांनी गुरुवारी फटाक्यांची आतषबाजी करून, पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला. सैनिकाच्या या आंतरराष्ट्रीय यशामुळे मोहगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, धनराज सिरसाठ यांची कामगिरी तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis