काँग्रेसचा उद्या देशव्यापी संविधान रक्षा मार्च
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मताधिकारापासून वंचित ठेवल्याच्या आरोपावरून काँग्रेसने २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त देशभरात ‘संविधान रक्षा मार्च’ काढण्याची घोषणा केली आहे. पक्षाचे महासचिव (संघटन) के.
CONG SAMVIDHAN RAKSHA MARCH IN


नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि मताधिकारापासून वंचित ठेवल्याच्या आरोपावरून काँग्रेसने २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त देशभरात ‘संविधान रक्षा मार्च’ काढण्याची घोषणा केली आहे.

पक्षाचे महासचिव (संघटन) के. सी. वेणुगोपाल यांनी मंगळवारी दिलेल्या निवेदनात सांगितले की, सर्व प्रदेश काँग्रेस समित्या आपापल्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मोर्चाचे आयोजन करणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लखनऊ येथे या मोर्चात सहभागी होणार आहेत. पक्षाने विद्यार्थी, युवक, शेतकरी, कामगार, महिला, दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक समुदाय आणि नागरी समाजातील नागरिकांना या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

वेणुगोपाल म्हणाले की, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशासमोर मतचोरीचे दस्तऐवजी पुरावे मांडले आहेत. त्यांनी कर्नाटकातील महादेवपुरा येथे बनावट आणि दुबार नोंदी, आलंद येथे हजारो खऱ्या मतदारांची नावे हटविण्याचे सुनियोजित प्रयत्न, तसेच हरियाणा आणि इतर राज्यांमधील गंभीर अनियमिततांचा उल्लेख केला. या घटना मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फेरफार होत असल्याचे संकेत देतात. त्यांनी आरोप केला की, निवडणूक आयोगाने निष्पक्ष चौकशी करण्याऐवजी हे निष्कर्ष फेटाळून लावले. विरोधी पक्षनेत्याकडे प्रतिज्ञापत्राची मागणी केली आणि तपास यंत्रणांनी मागितलेली माहितीही उपलब्ध करून दिली नाही.

काँग्रेस महासचिव म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी आयोगाने मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) सुरू केले. दुसऱ्या टप्प्यात ही प्रक्रिया १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपर्यंत, तर तिसऱ्या टप्प्यात १६ राज्ये आणि तीन केंद्रशासित प्रदेशांपर्यंत पोहोचली. मतदार याद्या शुद्ध करणे हा या प्रक्रियेचा घोषित उद्देश असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांना आपली पात्रता सिद्ध करण्यास भाग पाडले जात आहे.

वेणुगोपाल यांनी दावा केला की, बिहारच्या प्रारूप मतदार यादीतूनच ६५ लाखांहून अधिक नावे हटविण्यात आली आहेत. तिन्ही टप्प्यांमध्ये हटविण्यात आलेल्या नावांची संख्या १३ कोटींपेक्षा अधिक असण्याचा अंदाज आहे. या प्रक्रियेमुळे गरीब, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, स्थलांतरित कामगार आणि लग्नानंतर घर बदलणाऱ्या महिलांना सर्वाधिक धोका आहे. हे तेच घटक आहेत, ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांनी अधिकार मिळवून देण्यासाठी संघर्ष केला होता. वेणुगोपाल यांनी निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयोगाची सध्याची स्थिती तडजोडीची असल्याचा आरोप केला.

वेणुगोपाल यांनी सांगितले की, ‘संविधान रक्षा मार्च’ची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून होणार आहे. पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिक संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करतील. त्यानंतर संविधानाच्या रक्षणाची शपथ घेतली जाईल. या मोर्चाच्या माध्यमातून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या संवैधानिक मूल्यांप्रती आपली बांधिलकी पुन्हा एकदा व्यक्त केली जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande