
* आरोग्यसंपन्न समाज, राष्ट्ररक्षण आणि लोककल्याण यांसाठी सनातन संस्थेचे भव्य आयोजन
मुंबई/मंगळुरू, 25 नोव्हेंबर (हिं.स.) : आरोग्यसंपन्न समाज, राष्ट्ररक्षण आणि लोककल्याण या संकल्पाने भगवान श्रीकृष्णाची पावन नगरी असलेल्या उडुपी (कर्नाटक) येथे २९ नोव्हेंबर रोजी भव्य 'श्री महाधन्वंतरी याग' आयोजित करण्यात आला आहे. सनातन संस्थेच्या वतीने एम.जी.एम. महाविद्यालयाच्या मैदानावर दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत होणाऱ्या या ऐतिहासिक यागाचे प्रमुख आकर्षण म्हणजे १,००० वर्षांचा इतिहास लाभलेल्या प्राचीन 'सोरठी सोमनाथ ज्योतिर्लिंगा'च्या पवित्र अवशेषांचे दुर्लभ सार्वजनिक दर्शन होय. या यागासाठी आतापर्यंत ९,००० हून अधिक भाविकांनी निःशुल्क नोंदणी केली असून १५,००० हून अधिक भाविक सहभागी होण्याची अपेक्षा आहे, अशी माहिती आयोजकांनी उडुपी आणि मंगळुरू येथे सनातन संस्थेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदांमध्ये देण्यात आली.
प्राचीन सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या अवशेषांचे दुर्लभ दर्शन – महायागाचे प्रमुख आकर्षण
चंद्रदेवतेने स्थापन केलेल्या प्राचीन 'सोरठी सोमनाथ ज्योतिर्लिंगा'वर ई.स. १०२६ मध्ये महमूद गझनवीने आक्रमण केले होते. त्या वेळी श्रद्धाळू पुजाऱ्यांनी ज्योतिर्लिंगाचे पवित्र अवशेष गुप्तपणे सुरक्षित ठेवले. तब्बल १,००० वर्षे जतन केलेले हे पवित्र अवशेष तंजावरचे वेदकुलपती श्री. जी.के. सीतारामन गुरुजी यांनी जगासमोर आणले आहेत. त्यांपैकी चार पवित्र अवशेष सनातन संस्थेकडे सुपूर्द करण्यात आले असून, त्यांच्या दुर्लभ आध्यात्मिक दर्शनाचा लाभ भाविकांना या निमित्ताने घेता येणार आहे.
मानवजातीच्या आरोग्यासाठी सामूहिक आध्यात्मिक संकल्प आवश्यक : रामानंद गौड
सनातन संस्थेचे धर्मप्रचारक रामानंद गौड म्हणाले, जागतिक संघर्ष, महामारी आणि हवामान पालट यांच्या सध्याच्या काळात संपूर्ण मानवजातीचे आरोग्य आणि राष्ट्राच्या सुरक्षेसाठी वेदमंत्रांसह सामूहिक संकल्पाने भगवान श्री धन्वंतरी यांची आराधना करणे अत्यंत आवश्यक आहे.
अष्टमठाधीशांची पावन उपस्थिती आणि भव्य पूर्वतयारी
आयोजन समितीचे संयोजक श्री. गुरुप्रसाद गौड आणि स्वागत समितीचे संघटन सचिव श्री. विजय कोडवूर यांनी सांगितले की, उडुपीचे आमदार श्री. यशपाल सुवर्णा यांच्या अध्यक्षतेखाली स्वागत समितीची स्थापना करण्यात आली आहे. या महायागासाठी उडुपीचे अष्टमठाधीश तसेच विविध मठांचे पूज्य स्वामीजी, खासदार, आमदार आणि मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. एम.जी.एम. मैदानावर भव्य जर्मन हँगर मंडप, याग मंडप, धर्मग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनांच्या प्रदर्शनाच्या दालनांची सिद्धता २६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल. आमदार श्री. यशपाल सुवर्णा यांनी या महायागासाठी संपूर्ण सहकार्याची ग्वाही दिली आहे. या पत्रकार परिषदांना पूज्य रामानंद गौड, आमदार श्री. यशपाल सुवर्णा, श्री. गुरुप्रसाद गौड, श्री. विजय कोडवूर, श्री. रमेश शिंदे, श्री. नंदन मल्या, श्रीमती लक्ष्मी पै आणि श्री. एम.जे. शेट्टी उपस्थित होते.
प्रवेश निःशुल्क (नोंदणी अनिवार्य) –
https://www.sanatanrashtrashankhnad.in/events/shri-dhanvantari-mahayaag?lang=kn
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी