दिल्ली दंगल प्रकरण: सर्वोच्च न्यायालयाने शरजील इमाम आणि उमर खालिद यांचे जामीन अर्ज फेटाळले
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (हिं.स.)२०२० च्या दिल्ली दंगलीशी संबंधित ''मोठ्या कटा''च्या प्रकरणात जामिनासाठी शरजील इमाम आणि उमर खालिद यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उमर खालिद
सुप्रीम कोर्टा


नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (हिं.स.)२०२० च्या दिल्ली दंगलीशी संबंधित 'मोठ्या कटा'च्या प्रकरणात जामिनासाठी शरजील इमाम आणि उमर खालिद यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने उमर खालिद याचा अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळला आहे. या याचिकेवर विचार करण्यापूर्वी पोलिसांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमाल्या बागची आणि व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने त्यांचे अंतरिम जामीन अर्ज स्वीकारण्यास नकार दिला.

उमर खालिद यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी युक्तिवाद केला की, ते सहा वर्षांहून अधिक काळ कोठडीत आहेत. शरजील इमाम यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील सिद्धार्थ दवे यांनीही अशीच विनंती केली. पण, अंतरिम दिलासा देण्यापूर्वी प्रतिवादीचे म्हणणे ऐकून घेतले जाईल, असे खंडपीठाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले की, ही प्रकरणे प्रशासकीय स्तरावर सरन्यायाधीशांसमोर ठेवली जावीत, जेणेकरून तीन न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन करता येईल.

उमर खालिद यांच्या वतीने हजर असलेले ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी लवकर सुनावणी घेण्याची विनंती केली. सरन्यायाधीशांनी सांगितले की, खंडपीठाला प्रकरणातील तथ्यांची जाणीव असून त्यांनी पूर्ण तयारी केली आहे. ते म्हणाले, आम्ही आमचा अभ्यास पूर्ण केला आहे.

अंतरिम दिलासाच्या विनंतीवर सुनावणीसाठी हे प्रकरण सूचीबद्ध केले जाऊ शकते का, असे सिबल यांनी विचारले असता, सरन्यायाधीशांनी सांगितले की मुख्य प्रकरण सुनावणीसाठी सूचीबद्ध केले जाईल.

शरजील इमाम यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, या प्रकरणात २५ सप्टेंबर २०२० रोजी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. १८ आरोपींविरुद्ध खटला सुरू आहे. फिर्यादी पक्षाने ४७ संरक्षित साक्षीदारांसह ९०० हून अधिक साक्षीदारांची यादी दिली आहे. इमाम यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, ते सहा वर्षे नऊ महिन्यांपासून विचाराधीन कैदी म्हणून तुरुंगात आहेत, पण फिर्यादी पक्ष अद्याप एकाही साक्षीदाराची साक्ष नोंदवू शकलेला नाही.

उमर खालिद यांनी आपल्या याचिकेत संरक्षित साक्षीदारांच्या साक्षीचा अभाव असल्याचा मुद्दाही उपस्थित केला आणि असा युक्तिवाद केला की सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या एक वर्षाच्या कालावधीनंतर त्यांना तुरुंगात ठेवणे हे घटनेच्या कलम २१ चे उल्लंघन ठरेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande