
पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी केली होती हत्या
वृद्ध पिता आणि गतिमंद बहिणीचे जगणे शासनाच्या मदतीवर
लाहेरी (गडचिरोली) 25 नोव्हेंबर (हिं.स.) : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादाचा प्रभाव ओसरला, बंदुकींचा आवाज शांत झाला आणि विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली. मात्र, नक्षल हिंसाचाराने उद्ध्वस्त केलेल्या काही कुटुंबांच्या आयुष्यातील संघर्ष अद्याप संपलेला नाही. भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील दिनेश गावडे याची नक्षलवाद्यांनी पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून निर्घृण हत्या केली. या घटनेला तीन वर्षे उलटली, तरी त्याच्या कुटुंबाच्या वाट्याला आलेले दुःख आणि असुरक्षिततेचे सावट कायम आहे. कमावता मुलगा गमावलेले वृद्ध वडील आणि गतिमंद मुलीच्या भविष्याची चिंता... अशा दुहेरी संकटात हे कुटुंब आजही जगण्याची लढाई लढत आहे.
संशयाच्या एका ठिणगीत तरुणाचा बळी
भामरागड तालुक्यातील लाहेरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेनगुंडा येथे १५ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्री ही थरारक घटना घडली. पेनगुंडा-नेलगुंडा मार्गावर दिनेश गावडे याचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली होती. मृतदेहाजवळ नक्षलवाद्यांनी ठेवलेल्या चिठ्ठीत तो पोलिसांचा खबरी असल्यामुळे त्याची हत्या केल्याचा उल्लेख होता.
दिनेशने स्वतःचा ट्रॅक्टर कामासाठी पेनगुंडा येथे पाठविला होता. त्यावर देखरेख करण्यासाठी तो तेथे गेला असताना नक्षलवाद्यांनी मध्यरात्री त्याला गावाबाहेर नेऊन ठार केले. मात्र, तत्कालीन पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी दिनेश पोलिसांचा खबरी नसल्याचे स्पष्ट केले होते. एका संशयाने एका तरुणाचे आयुष्य संपवले आणि त्याच्या कुटुंबाला कायमचे पोरके केले.
स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न अधुरेच
स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, दिनेशच्या हत्येमागे केवळ खबरी असल्याचा संशय नव्हता, तर त्याच्या विचारसरणीचाही नक्षलवाद्यांना राग होता. भाजपचा कार्यकर्ता असलेला दिनेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रभावित होता. राजकीय कार्यासोबतच उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती.
स्वतःच्या पायावर उभे राहायचे, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचे आणि कुटुंबाला सुखाचे दिवस दाखवायचे, अशी त्याची स्वप्ने होती. मात्र, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या तरुणाच्या स्वप्नांचा नक्षलवाद्यांनी रक्तरंजित शेवट केला. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गडचिरोली दौऱ्यावर असतानाच ही हत्या घडल्याने या घटनेला विशेष राजकीय आणि सुरक्षाविषयक महत्त्व प्राप्त झाले होते.
वृद्ध खांद्यावर संसाराचा भार; मुलीच्या भविष्याची चिंता
आज नक्षलवादाचा प्रभाव ओसरल्यानंतर लाहेरीतील दिनेशच्या घराची परिस्थिती पाहिली, की शांततेच्या पर्वामागील वेदनादायी वास्तव समोर येते. दिनेशच्या पश्चात वृद्ध वडील पुस्सू गावडे आणि गतिमंद बहीण असे कुटुंब उरले आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह शासनाकडून मिळालेल्या मदत निधीच्या आधारावर सुरू आहे.वय झाले आहे, शरीराची साथ कमी झाली आहे; तरीही पुस्सू गावडे यांना तीन एकर शेतीत राबावे लागत आहे. कारण, स्वतःनंतर आपल्या गतिमंद मुलीची काळजी कोण घेणार, तिच्या आयुष्याचे पुढे काय होणार, या प्रश्नांनी त्यांना ग्रासले आहे. मुलाच्या मृत्यूचे दुःख उराशी बाळगून, मुलीच्या भविष्याची चिंता डोळ्यांत साठवून हा वृद्ध पिता आजही जगण्याची धडपड करीत आहे.एकेकाळी घराचा आधार असलेला मुलगा आज नाही. त्याने पाहिलेली स्वप्ने अपुरी राहिली आणि त्याच्या कुटुंबाला शासनाच्या मदतीवर दिवस काढण्याची वेळ आली. तीन वर्षांनंतरही या कुटुंबाच्या आयुष्यात स्वावलंबनाचा प्रकाश पोहोचलेला नाही.
शांततेच्या पर्वाला पुनर्वसनाची जोड कधी ?
नक्षलवाद संपुष्टात येणे ही गडचिरोलीच्या विकासाच्या दृष्टीने निश्चितच मोठी उपलब्धी आहे. मात्र, नक्षल हिंसाचारात आपले कर्ते पुरुष गमावलेल्या कुटुंबांचे काय? त्यांच्या पुनर्वसनाचे काय? वृद्धांचे संरक्षण, निराधारांच्या उदरनिर्वाहाची शाश्वती आणि दिव्यांगांच्या दीर्घकालीन संगोपनाची जबाबदारी कोण घेणार..?
एका तरुणाची हत्या करून नक्षलवाद्यांनी केवळ एक जीव संपवला नाही, तर एका कुटुंबाचा आधार आणि भविष्यही हिरावून घेतले. बंदुकींचा आवाज थांबला म्हणजे हिंसाचाराच्या जखमा भरून निघाल्या, असे होत नाही. त्या जखमांवर पुनर्वसन, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सुरक्षिततेची फुंकर घालणेही तितकेच आवश्यक आहे.
गडचिरोलीत नक्षलवादाचा अध्याय संपत असेल, तर दिनेश गावडे यांच्यासारख्या हिंसाचारग्रस्त कुटुंबांच्या संघर्षाचाही शेवट होणे गरजेचे आहे. कारण, खऱ्या शांततेची कसोटी नक्षलवादमुक्त गावांमध्ये नाही, तर त्या हिंसाचारात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांच्या सुरक्षित आणि सन्मानजनक जगण्यात आहे.
----------------------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी