
अमरावती, 25 नोव्हेंबर (हिं.स.)।
अमरावती - यवतमाळ या दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणारा महामार्ग सध्या वाढत्या वाहतुकीच्या प्रचंड दबावाखाली आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत असताना रस्त्याची रुंदी मात्र मर्यादितच असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अरुंद रस्ता, अवजड वाहनांची सततची वर्दळ, धोकादायक ओव्हरटेकिंग आणि अपघातांचा वाढता धोका पाहता, या महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गांचे रुंदीकरण आणि चौपदरीकरण होत असताना यवतमाळ-अमरावती हा महत्त्वाचा मार्ग अद्याप अपेक्षित विकासाच्या प्रतीक्षेत असल्याची खंत नागरिक व्यक्त करीत आहेत.
या महामार्गावरून आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेशाकडे जाणाऱ्या वाहनांची दिवसरात्र मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. प्रवासी वाहतूक, मालवाहतूक, खासगी वाहने तसेच अवजड वाहनांचा सततचा राबता असल्याने या मार्गाला दळणवळणाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. त्यातच महामार्गालगत असलेल्या मोठ्या लोकवस्तीच्या गावांमुळे स्थानिक नागरिक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांचीही मोठी वर्दळ असते. मात्र, वाढत्या वाहनसंख्येच्या तुलनेत रस्त्याची क्षमता अपुरी पडत असल्याने त्रास होतोय.या मार्गावर अनेक ठिकाणी वाहनांना एकमेकांना ओलांडताना मोठी कसरत करावी लागते. विशेषतः अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे लहान वाहने आणि दुचाकीस्वारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेत ओव्हरटेक करणे अनेकदा धोकादायक ठरते. त्यामुळे किरकोळ धडकांपासून गंभीर अपघातांपर्यंतच्या घटनांची शक्यता कायम आहे. केवळ पायाभूत सुविधांचा विषय म्हणून नव्हे, तर नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न म्हणून पाहण्याची गरज आहे.
------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी