
रत्नागिरी, 28 नोव्हेंबर (हिं.स.) । भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी संगमेश्वर उत्तर मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संगमेश्वरच्या गोळवलकर गुरुजी प्रकल्प येथे उत्साहात पार पडली. विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि संगमेश्वर उत्तर मंडळाचे तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
यावेळी नवनियुक्त संगमेश्वर तालुका प्रभारी तथा जिल्हा परिषद भाजप गटनेते प्रमोद अधटराव उपस्थित होते. बैठकीत आगामी निवडणुकांची तयारी, पक्ष संघटनेची बळकटी, बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांची सक्रियता आणि पक्षाच्या विविध कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
पक्षाची खरी ताकद बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांमध्ये असून, प्रत्येक बूथवर संघटनात्मक बांधणी मजबूत करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचे प्रत्येक बूथवर आयोजन करून त्यामध्ये कार्यकर्ते आणि नागरिकांचा सहभाग वाढविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आगामी निवडणुकांना सामोरे जाताना पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने आणि जोमाने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी पक्षाची दिनदर्शिका वाटप करण्यात आली. संगमेश्वर तालुक्यातील विकासकामे आणि आगामी काळातील विकासात्मक नियोजनाबाबतही चर्चा झाली.बैठकीला जिल्हा सरचिटणीस योगेश शिर्के, ओबीसी जिल्हाध्यक्ष सहदेव बेटकर, जिल्हा उपाध्यक्ष अभि शेट्ये, सरचिटणीस डॉ. अमित ताठरे, प्रशांत रानडे, गोमाता जिल्हाध्यक्ष अविनाश गुरव, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष स्वप्नील सुर्वे, तालुका उपाध्यक्ष सतीश पटेल यांच्यासह मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी