
रत्नागिरी, 28 नोव्हेंबर (हिं.स.) । गोगटे- जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) आणि अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने तसेच इतिहास शोध आणि बोध अभियान मंडळातर्फे आयोजित अतुल्य भारत प्रश्नमंजूषा स्पर्धा आज उत्साहात आणि चुरशीच्या वातावरणात पार पडली. स्पर्धेत फाटक हायस्कूलने प्रथम, दामले विद्यालयाने द्वितीय आणि ॲड. बाबासाहेब नानल गुरुकुलाने तृतीय क्रमांक पटकावला.
स्पर्धेत रत्नागिरीतील ९ शाळांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात आणि ऐतिहासिक दृष्टिकोनात भर घालणाऱ्या एकूण सात रंजक फेऱ्या स्पर्धेत पार पडल्या. स्पर्धेचे संचालन अनय जोशी आणि कीर्ती जोगळेकर यांनी केले.
बक्षीस वितरण समारंभात विजयी स्पर्धकांना आकर्षक ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरवले. सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांना पुस्तके देऊन सन्मानित केले. याप्रसंगी गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी, डॉ. पंकज घाटे, स्पर्धा समन्वयक निनाद तेंडुलकर आदी उपस्थित होते.
स्पर्धा समन्वयक निनाद तेंडुलकर यांनी प्रास्ताविक केले. फाटक हायस्कूलच्या तपस्या बोरकर हिने आणि शिक्षक प्रशांत मांडवकर यांनी मनोगत व्यक्त करत स्पर्धेच्या दर्जेदार नियोजनाचे कौतुक केले. संयोजक चमूमधून डॉ. पंकज घाटे यांनी स्पर्धेची स्पष्ट केली. अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य सुनील गोसावी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी