
नागपुरात राज्यस्तरीय फार्मसी सप्ताह उत्साहात
नागपूर, २८ नोव्हेंबर (हिं.स.) : प्रतिजैविकांचा अनावश्यक आणि चुकीचा वापर हा सार्वजनिक आरोग्यासमोरील गंभीर धोका बनत असून, सूक्ष्मजीवांमधील औषध प्रतिकारशक्ती (एएमआर) रोखण्यासाठी फार्मासिस्टनी अधिक सक्रिय भूमिका बजावण्याची गरज आहे, असे आवाहन भारतीय फार्मसी परिषदेचे (पीसीआय) अध्यक्ष डॉ. मोंटू कुमार पटेल यांनी केले. औषध वितरणापुरती भूमिका मर्यादित न ठेवता रुग्णांचे समुपदेशन, योग्य औषध वापराबाबत मार्गदर्शन आणि जनजागृतीची जबाबदारीही फार्मासिस्टनी पार पाडावी, असे त्यांनी स्पष्ट केले.
भारतीय फार्मसी परिषद, नवी दिल्ली यांच्या वतीने जागतिक फार्मासिस्ट दिन आणि राष्ट्रीय फार्मसी सप्ताह २०२६ चा महाराष्ट्रातील विदर्भ विभागाचा राज्यस्तरीय सोहळा शनिवारी नागपुरातील डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सभागृहात झाला. ‘स्वस्थ भारत : सूक्ष्मजीवांच्या औषध प्रतिकाराचा सामना’ ही या सोहळ्याची संकल्पना होती. विदर्भातील ८० हून अधिक फार्मसी संस्थांमधील सुमारे तीन हजार विद्यार्थी, प्राध्यापक आणि फार्मासिस्ट सहभागी झाले.
पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनीही वाढत्या औषध प्रतिकाराच्या धोक्याकडे लक्ष वेधले. प्रतिजैविकांची परिणामकारकता कमी झाल्यास संसर्गजन्य आजारांवरील उपचार अधिक गुंतागुंतीचे होऊ शकतात. त्यामुळे संशोधन, पुराव्याधारित उपचारपद्धती आणि रुग्णांचे प्रभावी समुपदेशन यांना प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. फार्मासिस्टकडे तांत्रिक ज्ञानासोबत चिकित्सक विचार आणि प्रभावी संवादकौशल्ये असणेही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषदेचे अध्यक्ष धनंजय जोशी यांनी बदलत्या आरोग्यसेवा व्यवस्थेत फार्मासिस्टची भूमिका अधिक व्यापक होत असल्याचे सांगितले. विशेषतः ग्रामीण आणि वंचित भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती पोहोचवण्यासाठी फार्मासिस्टचे प्रशिक्षण आणि सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या जनजागृती रॅलीने झाली. त्यानंतर एएमआर विषयावर तज्ज्ञांचा परिसंवाद झाला. फार्मा क्विझ, पोस्टर सादरीकरण, सायटून आणि पथनाट्य अशा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
प्रतिजैविकांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच करणे, औषधांचा अपूर्ण कोर्स टाळणे आणि स्वतःहून प्रतिजैविके न घेणे या बाबींबाबत जनजागृती करणेही एएमआरविरोधातील लढ्याचा महत्त्वाचा भाग आहे. जबाबदार औषध वितरण, विवेकपूर्ण वापर आणि लोकसहभागाच्या माध्यमातून औषधांची परिणामकारकता टिकवून ठेवण्याचा निर्धार या सोहळ्यात व्यक्त करण्यात आला.-----------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी