शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स १,५०२ अंकांनी उसळला
नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। परकीय गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली जोरदार खरेदी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाने मिळवलेली मजबुती यामुळे भारतीय शेअर बाजारात बुधवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली
Stock Market Closing


नवी दिल्ली, 25 नोव्हेंबर (हिं.स.)। परकीय गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली जोरदार खरेदी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली घसरण आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाने मिळवलेली मजबुती यामुळे भारतीय शेअर बाजारात बुधवारी जोरदार तेजी पाहायला मिळाली. मागील सोमवारी झालेल्या मोठ्या घसरणीनंतर बाजाराने दमदार पुनरागमन केले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १,५०२.29 अंकांनी, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४६९.60 अंकांनी वधारला. विशेषतः ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांमध्ये मोठी खरेदी झाल्याने बाजाराला बळ मिळाले.

बुधवारच्या व्यवहारात सेन्सेक्सने दोन हजार अंकांहून अधिक उसळी घेतली होती. तसेच निफ्टीने २५,९५० अंकांची पातळी ओलांडली होती. मात्र, वरच्या पातळीवर काही गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने तेजी काहीशी मर्यादित झाली. अखेर सेन्सेक्स १,५०२.२९ अंकांची म्हणजेच १.८२ टक्क्यांची वाढ नोंदवत ८३,९३८.२८ अंकांवर बंद झाला. निफ्टी ४६९.६० अंकांनी म्हणजेच १.८५ टक्क्यांनी वधारून २५,८१९.२५ अंकांवर स्थिरावला.

बाजारातील तेजीला परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या खरेदीचा मोठा आधार मिळाला. २३ नोव्हेंबर रोजी परकीय गुंतवणूकदारांनी रोख बाजारात ५,६७२.९९ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली. विशेष म्हणजे सलग दहा व्यवहारांच्या सत्रांमध्ये त्यांनी खरेदीचा ओघ कायम ठेवला आहे. दुसरीकडे, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी २,७६०.१२ कोटी रुपयांची निव्वळ विक्री केली.

क्षेत्रनिहाय व्यवहारात ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राने सर्वाधिक चमक दाखवली. निफ्टी एफएमसीजी निर्देशांक ३.७९ टक्क्यांनी वधारला. हिंदुस्तान युनिलिव्हरचा समभाग ६.०८ टक्क्यांनी उसळून २ हजार १४१.८० रुपयांवर पोहोचला. टाटा कन्झ्युमर प्रॉडक्ट्स ४.६६ टक्के, तर नेस्ले इंडियाचा समभाग ४.०३ टक्क्यांनी वधारला. औषधनिर्माण, वित्तीय सेवा, बँकिंग, वाहन आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही खरेदीचा जोर राहिला.

बँकिंग क्षेत्रात एचडीएफसी बँकेचा समभाग ३.४७ टक्के, तर आयसीआयसीआय बँकेचा समभाग ३.४४ टक्क्यांनी वधारला. एचडीएफसी लाईफमध्येही ४.५८ टक्क्यांची वाढ झाली. दुसरीकडे, धातू क्षेत्रातील समभागांमध्ये विक्रीचा दबाव कायम राहिला. निफ्टी मेटल निर्देशांक २.०६ टक्क्यांनी घसरला. टाटा स्टीलचा समभाग २.२७ टक्क्यांनी घसरून सर्वाधिक नुकसान झालेल्या प्रमुख समभागांमध्ये राहिला. निफ्टी मिडकॅप १०० मध्ये ०.२९ टक्क्यांची वाढ झाली, तर स्मॉलकॅप १०० मध्ये ०.५२ टक्क्यांची घसरण झाली.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेलाचे दर १.६ टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल ९० डॉलरच्या खाली आले. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास २४ टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे भारताच्या आयात खर्चात आणि महागाईच्या दबावात घट होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाही ६८ पैशांनी मजबूत होऊन ९२.१८ रुपयांवर पोहोचला. एकूणच परकीय गुंतवणुकीचा ओघ, स्वस्त कच्चे तेल आणि रुपयाची मजबुती यामुळे शेअर बाजारात तेजीचे वारे वाहू लागले आहेत

गुरु नानक जयंतीच्या सुट्टीमुळे २४ नोव्हेंबर रोजी शेअर बाजार बंद होता. दरम्यान, २३ नोव्हेंबर रोजी बाजार तोट्यात बंद झाला. सेन्सेक्स १,४८३ अंकांनी घसरून ८२,४३५ वर बंद झाला. निफ्टीदेखील ४५० अंकांनी घसरून २५,३४९ वर बंद झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande