
ढाका, 27 नोव्हेंबर (हिं.स.)।
माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या बांगलादेशात परतण्याच्या नियोजित दौऱ्याला काही आठवडे शिल्लक असतानाच तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कारवाईचा बडगा उगारल्याचे दिसत आहे. सरकारी वृत्तसंस्थाच्या वृत्तानुसार, गुरुवारी पहाटे अधिकाऱ्यांनी ढाका येथे शेख हसीना यांच्या माजी उपप्रेस सचिव के. एम. सखावत मून, माजी उपजिल्हाधिकारी मोहम्मद इलियास हुसेन आणि प्राप्तिकरविषयक वकील सूफी मोहम्मद अल मामून यांना अटक केली. या तिघांना धनमंडी-२७ परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
वृत्तानुसार, सत्ताधारी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) विद्यार्थी संघटनेच्या म्हणजेच जातीयताबादी छात्र दलाच्या (जेसीडी) नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या तिघांना आधी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मोहम्मदपूर पोलीस ठाण्याचे ड्युटी ऑफिसर आणि उपनिरीक्षक मसुदुर रहमान यांनी सांगितले की, या तिघांना न्यायालयात हजर करण्याची तयारी पोलीस करत आहेत.सरकारच्या या कारवाईमुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
बांगलादेश पुन्हा एकदा वाढत्या राजकीय तणावाच्या परिस्थितीतून जात आहे. १६ डिसेंबर रोजी हसीना भारतातून बांगलादेशात परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, त्यांच्या अनुपस्थितीत त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.बीएनपीच्या नेतृत्वाखालील सरकारने देशातील अनेक भागांत सुरक्षा व्यवस्था वाढवली असून सीमा सुरक्षा दलाच्या निमलष्करी पथकांच्या १०८ तुकड्या तैनात केल्या आहेत. यापैकी ५६ तुकड्या हसीना यांचा मूळ जिल्हा असलेल्या गोपालगंजमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत.
गेल्या काही आठवड्यांत संपूर्ण बांगलादेशात हिंसक घटनांमध्ये वाढ झाली आहे. या घटनांमध्ये रेल्वेगाड्या, बस, बँका आणि इतर वाहनांची जाळपोळ करण्यात आल्याच्या प्रकारांचा समावेश आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून सुरू झालेल्या राजकीय हिंसाचारात आतापर्यंत किमान चार जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच चार पोलीस ठाण्यांसह अनेक वाहने जाळण्यात आली आहेत.अलीकडील हिंसाचारासाठी हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे आणि त्यांच्याशी संबंधित संघटनांचे कार्यकर्ते जबाबदार असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. अवामी लीगच्या कारवायांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, हा पक्ष ऑनलाइन माध्यमांद्वारे २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी 'लॉकडाऊन' आंदोलनाला प्रोत्साहन देत आहे. या घटनांमुळे १६ डिसेंबरची तारीख जवळ येत असताना देशातील तणाव आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ऑगस्ट २०२४ मध्ये विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उठावामुळे सरकार कोसळल्यानंतर शेख हसीना यांनी ढाका सोडून भारतात आश्रय घेतला होता. तेव्हापासून त्या भारतातच वास्तव्यास आहेत. सध्या त्यांच्यासमोर बांगलादेशात गंभीर कायदेशीर आव्हाने उभी आहेत. २०२४ मधील उठावादरम्यान आंदोलकांवर करण्यात आलेल्या कारवाईप्रकरणी विशेष न्यायाधिकरणाने त्यांच्या अनुपस्थितीत त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे.
मात्र, शेख हसीना यांनी कोणत्याही गैरकृत्यात सहभागी असल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. तसेच या कायदेशीर प्रक्रियेच्या वैधतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बांगलादेशने भारताकडे त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. नवी दिल्लीने ढाक्याकडून अशी मागणी प्राप्त झाल्याचे मान्य केले असले, तरी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. या प्रकरणाची निश्चित प्रक्रियेनुसार तपासणी सुरू असल्याचे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode