
ढाका, 27 नोव्हेंबर (हिं.स.)।बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतातून मायदेशी परतण्याची घोषणा केली आहे. येत्या १६ डिसेंबर रोजी आपण बांगलादेशात परतणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांच्या या घोषणेवर बांगलादेशच्या परराष्ट्र राज्यमंत्र्यांनी शंका व्यक्त केली आहे.
वृत्तसंस्था च्या वृत्तानुसार, शेख हसीना यांच्या मायदेशी परतण्याच्या दाव्यावर राज्यमंत्र्यांनी गुरुवारी उपरोधिक टिप्पणी केली. डिसेंबरमध्ये केवळ थंडीचे आगमन होईल, सत्तेवरून हटवण्यात आलेल्या नेत्या परतणार नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. तारिक रहमान यांच्या एका निकटवर्तीयाने म्हटले आहे की, माजी पंतप्रधान शेख हसीना या भारतासोबत झालेल्या विद्यमान करारानुसार प्रत्यार्पण प्रक्रियेद्वारेच मायदेशी परतू शकतात.
‘कबीर यांनी सांगितले की, सिल्हेट येथील एका बैठकीत आपण यापूर्वीच स्पष्ट केले होते की, शेख हसीना डिसेंबरमध्ये परतणार नाहीत. डिसेंबरमध्ये कोणीही येणार नाही, तर केवळ थंडीचे आगमन होईल.ढाका येथील परराष्ट्र मंत्रालयात पत्रकारांशी संवाद साधताना कबीर यांनी ही टिप्पणी केली. बांगलादेशने प्रत्यार्पण करारानुसार शेख हसीना यांना मायदेशी सोपवण्याची मागणी करत भारतातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचेही त्यांनी सांगितले.
शेख हसीना यांना मायदेशी आणण्यासाठी त्यांच्या हातात बेड्या घालणे आवश्यक असल्याचे सांगत, त्यांना कडक सुरक्षाव्यवस्थेत बांगलादेशात आणावे लागेल, असेही मंत्र्यांनी म्हटले. त्यांच्यावर न्यायालयात खटला चालवता यावा, यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याचा दावा त्यांनी केला. शेख हसीना यांना परत आणण्याचा हाच एकमेव मार्ग असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भारतात निर्वासित जीवन जगत असलेल्या शेख हसीना यांनी मायदेशी परतण्याची तारीख जाहीर केली असताना बांगलादेशच्या मंत्र्यांचे हे विधान समोर आले आहे. आपण १६ डिसेंबर रोजी बांगलादेशात परतणार असल्याचे हसीना यांनी स्पष्ट केले आहे.विशेष म्हणजे, १६ डिसेंबर हा दिवस बांगलादेशात ‘विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. १९७१ मध्ये पाकिस्तानपासून मिळालेल्या स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode