
इस्लामाबाद, 27 नोव्हेंबर (हिं.स.)। पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्याक समुदायांतील मुली आणि महिलांचे अपहरण करून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणणे आणि त्यानंतर त्यांच्याशी विवाह लावून देण्याच्या घटना समोर आल्या आहेत. अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या ‘व्हॉइस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी’ (व्हीओपीएम) या संघटनेच्या अहवालानुसार, २०२६ मधील पहिल्या १० महिन्यांत किमान ८४ मुली आणि महिलांचे अपहरण करून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर त्यांचे विवाह लावून देण्यात आले. अल्पसंख्याकांविरोधातील हा गंभीर अत्याचार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
अहवालानुसार, अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणण्याच्या ८४ प्रकरणांमध्ये ४९ ख्रिश्चन आणि ३५ हिंदू मुली व महिलांचा समावेश आहे. यातील ४३ पीडित अल्पवयीन होत्या, तर सहा मुलींचे वय १४ वर्षांपेक्षाही कमी होते. या घटना धार्मिक अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.अहवालात दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सर्वाधिक ४७ प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यापैकी एकट्या लाहोरमध्ये १८ घटना घडल्या आहेत. तर सिंध प्रांतात ३६ प्रकरणे नोंदवण्यात आली असून, बलुचिस्तानमध्ये अपहरण आणि जबरदस्तीने धर्मांतराचे एक प्रकरण समोर आले आहे.
व्हीओपीएमच्या माहितीनुसार, २०२१ ते २०२५ या कालावधीत पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक समुदायांतील मुली आणि महिलांचे अपहरण करून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर घडवून आणल्याची ५१५ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. मात्र, प्रत्यक्षातील आकडा यापेक्षा कितीतरी अधिक असण्याची शक्यता मानवाधिकार कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. भीती आणि असुरक्षिततेमुळे अनेक कुटुंबे पोलिसांत तक्रार दाखल करत नाहीत. त्यामुळे या गुन्ह्यांची नेमकी आकडेवारी समोर येत नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या हवाल्याने व्हीओपीएमने आरोप केला आहे की, असे गुन्हे रोखण्यात आणि पीडित कुटुंबांना सुरक्षा पुरवण्यात पाकिस्तानी अधिकारी अपयशी ठरले आहेत. संघटनेने पोलीस आणि न्यायालयांच्या संथ कारभारावरही टीका केली आहे. कारवाईला होणाऱ्या विलंबामुळे कुटुंबांच्या अडचणी वाढतात आणि मुलींना पुन्हा घरी आणण्याची आशाही दिवसेंदिवस धूसर होत जाते, असे संघटनेने म्हटले आहे.
संघटनेने म्हटले आहे की, प्रत्येक आकडेवारीमागे एक अशी मुलगी आहे, जिला तिच्या घरातून जबरदस्तीने उचलून नेण्यात आले. तिच्या इच्छेविरुद्ध तिचे धर्मांतर करण्यात आले आणि तिने कधीही निवड न केलेल्या व्यक्तीशी तिचा विवाह लावून देण्यात आला. तिचे आई-वडील आजही तिचा शोध घेत आहेत आणि प्रत्येक दिवसागणिक त्यांची चिंता वाढत आहे. हे आकडे केवळ संख्या नसून, उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांची आणि पीडितांच्या आयुष्याची कहाणी असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
अहवालानुसार, अनेक कुटुंबे सूडाच्या कारवाईच्या भीतीने तक्रार दाखल करत नाहीत. आपल्या मुलींना सरकारी यंत्रणा सुरक्षा देऊ शकेल, याबाबत त्यांना विश्वास वाटत नाही. कुटुंबांचे हे मौन समस्येची वास्तविक गंभीरता लपवते आणि पीडितांचा सरकारी यंत्रणेवरील विश्वास किती कमी झाला आहे, हे दर्शवते, असे संघटनेने म्हटले आहे.
अहवालात पुढे म्हटले आहे की, एखाद्या मुलीला दुसऱ्या ठिकाणी नेऊन तिचे धर्मांतर घडवून आणल्यानंतर तिचा विवाह लावून दिला जातो. अशा परिस्थितीत तिच्या घरी परतण्याची शक्यता खूपच कमी होते. प्रत्येक आठवड्याला कारवाईत होणाऱ्या विलंबामुळे तिला परत आणणे अधिक कठीण होत जाते. अल्पवयीन मुली विवाह किंवा धर्मांतरासाठी स्वतंत्रपणे आणि स्वेच्छेने संमती देऊ शकत नाहीत, यावर संघटनेने विशेष भर दिला आहे.प्रत्येक प्रकरणाची तातडीने आणि निष्पक्ष चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच मुलांचे जबरदस्तीने धर्मांतर आणि विवाहापासून संरक्षण करणारा कायदा तयार करावा, अशी मागणी व्हीओपीएमने केली आहे.
जोपर्यंत अल्पसंख्याक कुटुंबांना आपल्या मुलींच्या सुरक्षेबाबत भीतीच्या वातावरणात जगावे लागत आहे, तोपर्यंत पाकिस्तान सर्व नागरिकांसाठी सुरक्षित देश असल्याचा दावा करू शकत नाही, असे संघटनेने म्हटले आहे. अहवालाच्या शेवटी संघटनेने पाकिस्तान सरकारला सवाल केला आहे की, सरकार या मुलींचे संरक्षण करणार की त्यांना असुरक्षित अवस्थेतच सोडून देणार? प्रत्येक महिन्याच्या विलंबाबरोबर आणखी काही कुटुंबांना आपल्या बेपत्ता मुलींच्या शोधात भटकावे लागेल, असेही संघटनेने म्हटले आहे.दरम्यान, गेल्या वर्षी हिंदू आणि ख्रिश्चन समुदायांवरील अत्याचारांवरून अमेरिकेनेही पाकिस्तानला चांगलेच धारेवर धरले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode