
वॉशिंग्टन, 27 नोव्हेंबर (हिं.स.)।अमेरिकन हवाई दलाच्या प्रमुख क्लाउड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म ‘क्लाउड वन’मध्ये (क्लाऊड वन) हॅकर्सनी घुसखोरी केली आहे.वृत्तानुसार, या घटनेची माहिती असलेल्या पाच व्यक्तींच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. या सायबर हल्ल्यामुळे अमेरिकन सैन्य, लष्करी कर्मचारी आणि रसद व्यवस्थापनाशी संबंधित संवेदनशील माहिती उघड होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दोन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात या प्लॅटफॉर्मचे अद्ययावतीकरण (अपग्रेड) सुरू असताना या घुसखोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे संपूर्ण यंत्रणेतील कामकाज विस्कळीत झाले. त्यानंतर हवाई दलाने इतर ॲप्लिकेशन्स या प्लॅटफॉर्मवर हस्तांतरित करण्याची प्रक्रिया थांबवली. तसेच नेटवर्कवर आधीपासून कार्यरत असलेल्या सॉफ्टवेअरचे अद्ययावतीकरणही रोखण्यात आले.हा सायबर हल्ला नेमका कोणी केला, हल्लेखोरांना किती प्रमाणात प्रवेश मिळाला आणि कोणत्याही प्रकारची माहिती चोरण्यात आली आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
एका सूत्राने वृत्तसंस्थेला सांगितले की, हल्लेखोरांनी सॉफ्टवेअरमधील त्रुटीचा फायदा घेत ‘क्लाउड वन’च्या ‘कंट्रोल प्लेन’मध्ये प्रवेश मिळवला. हे कंट्रोल प्लेन संपूर्ण क्लाउड पायाभूत सुविधांचे नियंत्रण करते.एका सूत्राने या प्रवेशाची तुलना ‘युनिव्हर्सल रिमोट’शी केली. अशा प्रकारचा प्रवेश मिळाल्यास हल्लेखोरांना लष्करी विमानांची सद्यस्थिती तपासता येऊ शकते किंवा सुट्या भागांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवता येऊ शकते. मात्र, हॅकर्सनी प्रत्यक्षात अशा प्रकारची कोणतीही माहिती मिळवली आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घुसखोरीनंतर ‘क्लाउड वन’ प्लॅटफॉर्मवर अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.बॅक-ऑफिसशी संबंधित ॲप्लिकेशन्स ‘क्लाउड वन’वर स्थलांतरित करण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.कर्मचाऱ्यांना सॉफ्टवेअर अपडेट किंवा सुरक्षा दुरुस्त्या (सिक्युरिटी फिक्सेस) स्थापित करण्यास मनाई करण्यात आली आहे. काही वापरकर्त्यांचे प्रशासकीय अधिकार (ॲडमिनिस्ट्रेटर ॲक्सेस) काढून घेण्यात आले आहेत.या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी ‘यूएस सायबर कमांड’ला पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेबाबत प्रतिक्रिया मागवली असता अमेरिकन हवाई दलाच्या सायबर ऑपरेशन्स युनिटने कोणतेही उत्तर दिलेले नाही.
‘क्लाउड वन’ हा अमेरिकन हवाई दलाच्या विविध कामकाजांना सहाय्य करणारा महत्त्वाचा क्लाउड कम्प्युटिंग प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये लष्करी कर्मचाऱ्यांच्या नोंदी, वेतन, रसद व्यवस्थापन आणि उपकरणांची देखभाल अशा अनेक महत्त्वाच्या कामांचा समावेश आहे.या प्लॅटफॉर्ममध्ये ‘क्लाउड-आधारित कमांड अँड कंट्रोल सिस्टीम’चाही समावेश आहे. ही यंत्रणा संपूर्ण उत्तर अमेरिकेतील हवाई संरक्षण रडारकडून मिळणारी माहिती आणि इतर महत्त्वाच्या तपशिलांचे एकत्रीकरण करते.याशिवाय, ‘थिएटर इंटिग्रेटेड कॉम्बॅट म्युनिशन सिस्टीम’च्या माध्यमातून जगभरातील अमेरिकन हवाई दलाच्या २०० हून अधिक लष्करी तळांवरील बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचा मागोवा घेतला जातो.२०१७ मध्ये सुरू करण्यात आलेल्या या प्लॅटफॉर्ममध्ये मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, ओरॅकल आणि अल्फाबेट या कंपन्यांच्या क्लाउड सेवांचा वापर केला जातो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode