रायगड - हलीवलीत बंद घरात घरफोडी; ८ ते १० तोळे सोने आणि रोख रक्कम लंपास
रायगड, 27 नोव्हेंबर (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील हलीवली ग्रामपंचायत हद्दीतील सियोत सोसायटीमध्ये बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत अंदाजे आठ ते दहा तोळे सोन्याचे दागिने आणि ७० ते ८० हजार रुप
Burglary at a locked house in Halivali; 8 to 10 tolas of gold and cash stolen


Burglary at a locked house in Halivali; 8 to 10 tolas of gold and cash stolen


रायगड, 27 नोव्हेंबर (हिं.स.)। कर्जत तालुक्यातील हलीवली ग्रामपंचायत हद्दीतील सियोत सोसायटीमध्ये बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीत अंदाजे आठ ते दहा तोळे सोन्याचे दागिने आणि ७० ते ८० हजार रुपयांची रोख रक्कम चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे.

सियोत सोसायटीमध्ये दिलीप मोहन मेहता हे पत्नीसमवेत राहतात. हे दाम्पत्य पुण्यातील हडपसर येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाट आणि लॉकर फोडून त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.

या चोरीची माहिती दिलीप मेहता यांचे जावई बिपिन रमेश लाड यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान, बंद घरांना लक्ष्य करून झालेल्या या चोरीमुळे हलीवली आणि कर्जत परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. चोरट्यांचा लवकरात लवकर छडा लावून त्यांना जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande