
लातूर, 27 नोव्हेंबर (हिं.स.)। सामाजिक संस्थेच्या नावाचा वापर करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करत नागरिकांकडून देणगी स्वीकारली आणि ही रक्कम संस्थेच्या खात्यात जमा न करता स्वतःच्या वैयक्तिक बँक खात्यात वळविल्याचा धक्कादायक प्रकार लातूरमध्ये समोर आला आहे. या प्रकरणी प्रशांत प्रभाकर सुरवसे याच्याविरुद्ध लातूर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर येथील समता फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या नावाचा वापर करून हा प्रकार करण्यात आल्याची तक्रार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय वसंतराव काळे, दहशतवाद विरोधी पथक, नांदेड विभाग, कॅम्प लातूर यांनी दिली आहे.
तक्रारीनुसार, समता फाउंडेशनच्या समाजमाध्यमावरील पानावर ५ जुलै २०२६ रोजी शिक्षणापासून वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन करणारी पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली होती. या पोस्टमध्ये क्यूआर संकेताद्वारे देणगी स्वीकारली जात असल्याचे नमूद करण्यात आले होते.
तक्रारदारांनी २२ सप्टेंबर २०२६ रोजी संबंधित क्यूआर संकेत स्कॅन करून १०० रुपये देणगी पाठविली. मात्र, ही रक्कम समता फाउंडेशनच्या संस्थात्मक खात्यात जमा न होता प्रशांत प्रभाकर सुरवसे यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संस्थेच्या नोंदणी कागदपत्रांची आणि लेखापरीक्षण अहवालांची पडताळणी केली असता त्यामध्येही विसंगती आढळल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी सामाजिक संस्थेच्या नावाचा आणि डिजिटल पेमेंट सुविधेचा वापर करून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून प्रशांत प्रभाकर सुरवसे याच्याविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(क) तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१६(२), ३१८(४) आणि ३१९(२) अन्वये २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायबर पोलीस ठाणे, लातूर येथे गुन्हा क्रमांक ०८/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis