यवतमाळमध्ये ‘नायलॉन मांजा’ने कापला वृद्धाचा कान
यवतमाळ , 27 नोव्हेंबर (हिं.स.)। शहरातील मकवानी ले-आऊटमधील घटना; खासगी रुग्णालयात दाखल मोटार सायकलने जाताना नायलॉन मांजामुळे चक्क एका वयोवृद्धाचा कान तुटून खाली पडला. रक्तबंबाळ अवस्थेत त्या वृद्धाला खासगी रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले
‘नायलॉन मांजा’ने तुटला चक्क वृद्धाचा कान


यवतमाळ , 27 नोव्हेंबर (हिं.स.)।

शहरातील मकवानी ले-आऊटमधील घटना; खासगी रुग्णालयात दाखल

मोटार सायकलने जाताना नायलॉन मांजामुळे चक्क एका वयोवृद्धाचा कान तुटून खाली पडला. रक्तबंबाळ अवस्थेत त्या वृद्धाला खासगी रुग्णालयात उपचाराकरिता भरती करण्यात आले. ही ह्रदयद्रावक घटना मकवानी ले-आउट परिसरात घडली. हसीबउल्लाह इनामदार (वय ६५, रा. मकवानी ले-आउट, यवतमाळ), असे जखमीचे नाव आहे. दरवर्षी नायलॉन मांजाचा मुद्दा ऐरणीवर येतो. विक्री आणि खरेदी बंद असतानाही बच्चेकंपनीच्या हाती आतापासूनच नायलॉन मांजाची डोर आहे. यातून अनेक अनुचित घटना घडत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. असाच काहीसा प्रकार बुधवारी सायंकाळच्या सुमारास नागपूर रोडवरील मकवानी ले-आउट परिसरात घडला. हसीबउल्लाह इनामदार मोटारसायकलने घराच्या दिशेने निघाले होते. अशात एका ऑटोला नायलॉन मांजा अडकला होता. ही बाब वाहन चालविताना त्यांच्या निदर्शनास आलीच नाही. त्यामुळे नायलॉन मांजा अडकल्याने चक्क त्यांचा कान रस्त्यावर तुटून पडला. अचानक घडलेल्या घटनेमुळे ते पूर्णत: गोंधळून गेले होते. रक्तबंबाळ अवस्थेत ते वाहन सोडून खाली बसले असता, घटनास्थळावर एकच गर्दी जमली होती. त्यानंतर उपस्थितांनी त्यांना तातडीने लगतच्या एका खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार करून तात्पुरत्या स्वरूपात टाके मारून कान बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो कान आता पूर्वीप्रमाणे बसणार की नाही, हा महत्त्वाचा विषय आहे. एकंदरीत नायलॉन मांजाने घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande