
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर (हिं.स.)। देशाच्या परकीय चलनसाठ्यात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण नोंदवण्यात आली आहे. २० नोव्हेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलनसाठा ४.४४३ अब्ज डॉलरने घटून ७००.९० अब्ज डॉलरवर आला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती दिली. यापूर्वीच्या आठवड्यात देशाचा परकीय चलनसाठा १४.२१ अब्ज डॉलरने घटून ७०५.३४ अब्ज डॉलरवर आला होता.
आरबीआयच्या आकडेवारीनुसार, या कालावधीत परकीय चलनसाठ्यातील सर्वात मोठा हिस्सा असलेल्या परकीय चलन मालमत्तेत २६.६ कोटी डॉलरची घट झाली असून, हा साठा ५८३.१८ अब्ज डॉलरवर आला आहे. त्याचवेळी सोन्याच्या साठ्यात सलग दुसऱ्या आठवड्यात घसरण झाली. सोन्याच्या साठ्यात ४.०९ अब्ज डॉलरची मोठी घट होऊन तो ९४.५२ अब्ज डॉलरवर आला आहे.
आकडेवारीनुसार, विशेष आहरण अधिकार (एसडीआर) ६.७ कोटी डॉलरने घटून १८.४५ अब्ज डॉलरवर आले आहेत. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)कडे असलेला भारताचा राखीव साठा १.५ कोटी डॉलरने घटून ४.७४ अब्ज डॉलरवर आला आहे.
उल्लेखनीय म्हणजे, ४ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलनसाठा ७८५.७० अब्ज डॉलर या आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता. अनिवासी भारतीयांच्या ठेवींवर विशेष सवलतीच्या अदलाबदल व्यवस्थेअंतर्गत मोठ्या प्रमाणात परकीय चलन देशात आल्यामुळे ही वाढ झाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule