
सोने एक हजार, तर चांदी किलोमागे ४ हजारांनी महागली
जळगाव, २७ नोव्हेंबर (हिं.स.) : गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आज गुरुवारी (२७ नोव्हेंबर) जळगाव सराफा बाजार उघडताच दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरांनी पुन्हा उसळी घेतली. सोन्याच्या दरात प्रतितोळा १ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात प्रतिकिलो ४ हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सराफा बाजारात पुन्हा तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जळगाव सराफा बाजारात आज सोन्याचा दर प्रतितोळा १ लाख २५ हजार ५०० रुपये, तर चांदीचा दर प्रतिकिलो १ लाख ५६ हजार रुपये नोंदविण्यात आला. सलग दोन दिवसांच्या घसरणीनंतर अचानक झालेल्या या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खरेदीच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. दोन दिवसांपूर्वी दरात घसरण झाल्याने लग्नसराईसाठी दागिन्यांची खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या वाढीने ग्राहकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.
लग्नसराईतील खरेदीदारांची चिंता वाढली
सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने अनेक ग्राहक दागिन्यांच्या खरेदीच्या तयारीत आहेत. मात्र, दरांमधील सततच्या चढ-उतारामुळे खरेदी करावी की दर आणखी कमी होण्याची प्रतीक्षा करावी, असा प्रश्न ग्राहकांसमोर निर्माण झाला आहे. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांच्या खरेदीच्या बजेटवर या दरवाढीचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, डॉलरचे मूल्य तसेच भारतीय रुपयातील चढ-उतार यांसारख्या घटकांचा सोन्या-चांदीच्या किमतींवर परिणाम होत असतो. त्यामुळे आगामी दिवसांत दरांमध्ये पुन्हा घसरण होणार की तेजी कायम राहणार, याबाबत अनिश्चितता आहे. परिणामी, जळगावमधील ग्राहकांसह सराफा व्यावसायिकांचेही आगामी बाजारभावाकडे लक्ष लागले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर