शेअर बाजारातील चार सत्रांची तेजी थांबली; सेन्सेक्स ९८९ अंकांनी कोसळला
नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर (हिं.स.)। पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमतींमधील तेजी आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेचा मोठा परिणाम भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळाला. आठवड्याच्या अखेरच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा
Stock Market Closing Update


नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर (हिं.स.)। पश्चिम आशियातील वाढता संघर्ष, कच्च्या तेलाच्या किमतींमधील तेजी आणि जागतिक आर्थिक अनिश्चिततेचा मोठा परिणाम भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळाला. आठवड्याच्या अखेरच्या व्यवहाराच्या दिवशी शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये एक टक्क्याहून अधिक घसरण झाली. माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, वित्तीय सेवा आणि वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्याने बाजार लाल निशाणावर बंद झाला.

शुक्रवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स ९८९.३३ अंकांनी म्हणजेच १.१७ टक्क्यांनी घसरून ८३,३३९.२६ अंकांवर स्थिरावला. तर निफ्टी ५० मध्ये २७७.३० अंकांची म्हणजेच १.०७ टक्क्यांची घसरण होऊन तो २५,६०७.२० अंकांवर बंद झाला. दिवसभराच्या व्यवहारात सेन्सेक्सने ८३,२०८.३३ अंकांची नीचांकी पातळी गाठली, तर निफ्टी २५,५६५.९० अंकांपर्यंत घसरला होता.

पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी उसळी घेतली आहे. ब्रेंट क्रूड तेलाचा दर प्रति बॅरल ९७ डॉलरच्या जवळ पोहोचल्याने भारतीय गुंतवणूकदारांच्या चिंतेत भर पडली. भारताला मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करावी लागत असल्याने तेलाच्या वाढत्या किमतींचा परिणाम देशाच्या आयात खर्चावर आणि महागाईवर होण्याची शक्यता आहे. याशिवाय अमेरिका आणि भारत यांच्यातील प्रस्तावित व्यापार शुल्काबाबतची अनिश्चितताही बाजारातील नकारात्मक वातावरणाला कारणीभूत ठरली.

क्षेत्रनिहाय व्यवहारात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला. निफ्टी माहिती तंत्रज्ञान निर्देशांक १.८८ टक्क्यांनी घसरला. एचसीएल टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस यांच्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली. वाहन क्षेत्राचा निर्देशांक १.४८ टक्क्यांनी, तर स्थावर मालमत्ता क्षेत्राचा निर्देशांक १.४३ टक्क्यांनी घसरला. वित्तीय सेवा क्षेत्रात १.३३ टक्के आणि बँकिंग क्षेत्रात ०.७८ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली. ग्राहक वस्तू क्षेत्राचाही निर्देशांक सलग दुसऱ्या दिवशी घसरला.

दुसरीकडे, धातू क्षेत्रातील समभागांनी बाजाराला काहीसा आधार दिला. निफ्टी धातू निर्देशांक १.३८ टक्क्यांनी वधारून सर्वाधिक तेजी नोंदवणारा क्षेत्रीय निर्देशांक ठरला. जेएसडब्ल्यू स्टील आणि हिंदाल्को इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये खरेदी दिसून आली. प्रसारमाध्यमे आणि ऊर्जा क्षेत्राचे निर्देशांकही वाढीसह बंद झाले.

समभागांच्या कामगिरीत श्रीराम फायनान्सला सर्वाधिक फटका बसला. कंपनीचा समभाग ३.९९ टक्क्यांनी घसरला. बजाज ऑटो, एचसीएल टेक्नॉलॉजीज, इन्फोसिस आणि टीसीएस यांच्या समभागांमध्येही घसरण झाली. याउलट बीईएल, जेएसडब्ल्यू स्टील, टायटन, हिंदाल्को, एसबीआय लाइफ, ओएनजीसी आणि इंडिगो यांच्या समभागांमध्ये तेजी दिसून आली.

दरम्यान, प्रमुख निर्देशांकांमध्ये मोठी घसरण झाली असली तरी मध्यम आणि लघु कंपन्यांच्या समभागांनी तुलनेने चांगली कामगिरी केली. निफ्टी मिडकॅप १०० निर्देशांक ०.१० टक्क्यांनी, तर निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक ०.५६ टक्क्यांनी वधारला. मागील तीन व्यवहारांचा एकत्रित विचार करता सेन्सेक्समध्ये सुमारे ९०३ अंकांची, तर निफ्टीमध्ये २५८ अंकांची वाढ कायम आहे. त्यामुळे शुक्रवारची घसरण ही मोठ्या बाजार सुधारणेची सुरुवात ठरणार की तात्पुरती नफावसुली, याकडे आता गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande