
मुंबई, 27 नोव्हेंबर (हिं.स.) - आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या मुंबई इंडियन्सने आगामी आयपीएल 2027 हंगामासाठी नव्या कर्णधाराची अधिकृत घोषणा केली आहे. मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे पुन्हा एकदा संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. यामुळे क्रिकेटप्रेमी आणि रोहितच्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. 2013 ते 2024 या 11 वर्षांच्या कालावधीत संघाचे नेतृत्व केल्यानंतर या अनुभवी खेळाडूला पदावरून हटवण्यात आले आणि हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार, तर सूर्यकुमार यादवला त्याचा उपकर्णधार म्हणून घोषित करण्यात आले होते. पाच वेळच्या विजेत्या संघासाठी हा निर्णय फारसा यशस्वी ठरला नाही, कारण गेल्या तीन वर्षांत ते केवळ एकदाच प्लेऑफसाठी पात्र ठरले.
आयपीएल २०२७ हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार कोण, याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मुंबई इंडियन्सने अखेर पोस्ट शेअर करत याची घोषणा केली आहे. मुंबईचा राजा अशी ओळख निर्माण केलेल्या रोहित शर्माला मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी संघाचा कर्णधार जाहीर केलं आहे. ही घोषणा करताना एक कमालीचा व्हिडीओ शेअर केला आहे.
मुंबई इंडियन्ससह रोहित शर्माचा प्रवास खास राहिला आहे. २०११ मध्ये संघात दाखल झाल्यापासून तो संघाच्या अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार ठरला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच आयपीएल विजेतेपदं पटकावली. तसेच संघाची विजयी मानसिकता घडवण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचं नेतृत्व, युवा खेळाडूंवरील विश्वास आणि मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांशी असलेलं घट्ट नातं यामुळे तो संघाच्या इतिहासाचा अविभाज्य भाग बनला आहे.
आयपीएल २०२६च्या हंगामातही हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने १४ पैकी १० सामने गमावले होते. संघाला गुणतालिकेत नवव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. याचबरोबर मुंबईचा आयपीएल विजेतेपदाचा दुष्काळ सहा वर्षांपर्यंत वाढला होता. त्यामुळे कर्णधार बदलण्याचा निर्णय जोर धरून होता. हार्दिक पंड्याला ट्रेड ऑफ करून आता मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्स संघाचा भाग राहिलेल्या अर्शदीप सिंगला संघात सामील केलं, त्यामुळे मुंबईत कॅप्टनचा मार्ग मोकळा झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी