टेवेझच्या निरोपाच्या सामन्यात खेळणार लिओनेल मेस्सी; २० डिसेंबरला रंगणार फुटबॉलचा महासंग्राम
बोका ज्युनियर्सच्या ला बॉम्बोनेरा स्टेडियमवर होणार सामना; अनेक दिग्गज फुटबॉलपटूंचाही सहभाग नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर (हिं.स.)। अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आपला माजी सहकारी कार्लोस टेवेझ याच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या निरोप
Sports Football Messi Play Tevez Testimonial Match


- बोका ज्युनियर्सच्या ला बॉम्बोनेरा स्टेडियमवर होणार सामना; अनेक दिग्गज फुटबॉलपटूंचाही सहभाग

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर (हिं.स.)। अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आपला माजी सहकारी कार्लोस टेवेझ याच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेल्या निरोपाच्या सामन्यात सहभागी होणार आहे. आयोजकांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, हा सामना २० डिसेंबर रोजी खेळवण्यात येणार आहे.

‘अपाचे’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेल्या टेवेझने २०२२ मध्ये फुटबॉलमधून निवृत्ती घेतली होती. आपल्या कारकिर्दीत त्याने मँचेस्टर सिटी, मँचेस्टर युनायटेड आणि युव्हेंटस यांसारख्या नामांकित क्लबकडून खेळण्याचा अनुभव घेतला आहे.

४२ वर्षीय टेवेझने आपल्या बालपणीच्या बोका ज्युनियर्स या क्लबकडून खेळताना कारकिर्दीचा शेवट केला होता. गेल्या वर्षी त्याने आपल्या विदाई सामन्यात मेस्सी आणि मँचेस्टर युनायटेडमधील त्याचा माजी सहकारी ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी एकमेकांविरुद्धच्या संघांकडून खेळावे, अशी इच्छा व्यक्त केली होती.

आयोजकांनी गुरुवारी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटले की, अपाचेच्या अखेरच्या सामन्यात जगातील सर्वोत्तम खेळाडूचे स्वागत करणे आमच्यासाठी खऱ्या अर्थाने सन्मानाची बाब असेल. या सामन्यासाठी रिओ फर्डिनांड, सर्जिओ अगुएरो, लिएँड्रो परेदेस, जियानलुईजी बुफोन आणि मार्टिन पालेरमो यांच्यासह अनेक दिग्गज फुटबॉलपटूंच्या सहभागाचीही पुष्टी करण्यात आली आहे. हा सामना बोका ज्युनियर्सच्या ला बॉम्बोनेरा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande