औषधनिर्मितीतील शाश्वत तंत्रज्ञानावर राष्ट्रीय परिषदेत विचारमंथन
नाशिक, 28 नोव्हेंबर (हिं.स.)। एमजीव्ही फार्मसी महाविद्यालयात दोन दिवसीय परिषदेचे आयोजन औषधनिर्मिती क्षेत्रात पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा , हरित रसायनशास्त्राचा विकास, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने शाश्वत उ
National Conference brainstorms


नाशिक, 28 नोव्हेंबर (हिं.स.)।

एमजीव्ही फार्मसी महाविद्यालयात दोन दिवसीय परिषदेचे आयोजन

औषधनिर्मिती क्षेत्रात पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा , हरित रसायनशास्त्राचा विकास, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने शाश्वत उत्पादन प्रक्रिया विकसित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित फार्मसी स्वायत्त महाविद्यालय, हिरे नॉलेज कॅम्पस, पंचवटी येथे उत्साहात संपन्न झाली. दि. २७ व २८ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘Pharmaceutical Process Chemistry: Sustainable Approaches, Indian Scenario and Global Perspectives’ अर्थात ‘औषधनिर्माण प्रक्रियेतील रसायनशास्त्र : शाश्वत दृष्टिकोन, भारतीय परिस्थिती आणि जागतिक परिप्रेक्ष्य’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रायोजकत्व लाभलेल्या या परिषदेचे आयोजन महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्ष (IQAC), इनोव्हेशन सेल (IIC) आणि ARC यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

परिषदेच्या विविध तांत्रिक सत्रांमध्ये औषधनिर्मिती प्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञान, संशोधनातील नवनवीन संकल्पना, हरित रसायनशास्त्र आणि औद्योगिक उत्पादनातील शाश्वततेचे महत्त्व यावर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात जेनोटेक बायोकेम, इंडिया येथील मुख्य वैज्ञानिक सल्लागार डॉ. विकास शिरसाठ यांनी ‘कृत्रिम रसायनशास्त्रापासून शाश्वत औषधनिर्मितीपर्यंतचा प्रवास’ या विषयावर विचार मांडले. CSIR-NCL, पुणे येथील मुख्य वैज्ञानिक डॉ. संतोष कुमार श्रीरामोजू यांनी मोठ्या प्रमाणावरील शाश्वत औषधनिर्मिती, सातत्यपूर्ण उत्पादन प्रक्रिया, पर्यायी संश्लेषण पद्धती आणि औद्योगिक कार्बन उत्सर्जन नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले.

तिसऱ्या सत्रात के. के. वाघ पॉलिटेक्निक, नाशिक येथील रासायनिक अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. प्रवीण भंडारी यांनी हरित संश्लेषण, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन आणि शाश्वत औद्योगिक प्रक्रियांपुढील आव्हाने याविषयी विवेचन केले. चौथ्या सत्रात सल्लागार रोहित डेंगाळे यांनी प्रयोगशाळेतील संशोधनाचे औद्योगिक उत्पादनात रूपांतर करताना प्रक्रिया तज्ज्ञांची भूमिका आणि त्यातील महत्त्वपूर्ण टप्पे स्पष्ट केले. पाचव्या सत्रात युनिव्हर्सिटी ऑफ सफोक, युनायटेड किंगडम येथील प्रा. डॉ. भूषण बोंडे यांनी हरित रसायनशास्त्राच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जनरेटिव्ह एआयच्या उपयोजनांवर मार्गदर्शन केले.

परिषदेत हरित संश्लेषण, संसाधनांचा कार्यक्षम वापर, औद्योगिक कचऱ्याचे प्रमाण कमी करणे, आधुनिक औषधनिर्मिती प्रक्रिया आणि संशोधनातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर या विषयांवर सखोल विचारमंथन झाले. जागतिक औषधनिर्माण उद्योगातील बदलते प्रवाह, पर्यावरणपूरक उत्पादनाची वाढती गरज आणि भविष्यातील संशोधनाच्या संधी यांची माहिती विद्यार्थी, संशोधक आणि प्राध्यापकांना मिळाली.

या राष्ट्रीय परिषदेत संशोधक आणि विद्यार्थ्यांना आपल्या संशोधनाचे पोस्टरच्या माध्यमातून सादरीकरण करण्याची संधी देण्यात आली होती. या स्पर्धेत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कॉलेज ऑफ फार्मसीच्या गौरव दुधाट याने प्रथम क्रमांक पटकावला. एमजीव्ही फार्मसी स्वायत्त महाविद्यालय, पंचवटी येथील हर्षाली घंरटे हिने द्वितीय क्रमांक, तर एमजीव्ही एल.व्ही.एच. पंचवटी कॉलेजची रेहाना खान हिने तृतीय क्रमांक मिळविला.

संस्थेचे समन्वयक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा महाविद्यालयाच्या गव्हर्निंग बॉडीचे अध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे आणि महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेशजी एस. शिंदे यांचे परिषदेच्या आयोजनासाठी मार्गदर्शन लाभले. यावेळी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. अमृतकर, डॉ. श्रीकांत घोडसे, श्री. सुहास झांबरे, डॉ. प्रमोद कातकडे, स्मिता सौदागर यांच्यासह प्राध्यापक, संशोधक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष तांबे आणि प्राचार्य डॉ. राजेंद्र भांबर यांच्या मार्गदर्शनाखाली परिषदेचे सहसंयोजक उपप्राचार्य प्रा. किरण एरंडे, डॉ. सुवर्णा कट्टी, डॉ. सोनाली पवार तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकांनी परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande