
रत्नागिरी, 28 नोव्हेंबर (हिं.स.) । ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक तसेच सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ मिळावे, या उद्देशाने राज्य सरकारने परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. महामंडळाच्या विविध योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांचे अर्ज प्रत्यक्ष स्वीकारण्याकरिता विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीत येत्या ४ डिसेंबर २०२६ रोजी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी सभागृहात सकाळी ११ वाजल्यापासून अर्ज स्वीकारले जाणार आहेत, अशी माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेश सप्रे यांनी दिली.
राज्यातील विविध विभागीय मुख्यालयांमध्ये टप्प्याटप्प्याने ही अर्ज स्वीकृती मोहीम राबविण्यात येणार आहे. महामंडळामार्फत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा आणि गट कर्ज व्याज परतावा अशा प्रमुख योजना राबविण्यात येत आहेत. वैयक्तिक कर्ज योजनेअंतर्गत बँक किंवा सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते नियमित भरल्यास, कमाल १२ टक्के किंवा बँकेने आकारलेला प्रत्यक्ष व्याजदर यापैकी जो कमी असेल त्या दराने सात वर्षांपर्यंत व्याज परतावा दिला जाणार आहे.
या योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांच्या कर्जासाठी कमाल दीड लाख रुपये, दहा लाख रुपयांच्या कर्जासाठी तीन लाख रुपये, तर १५ लाख रुपयांच्या कर्जासाठी कमाल साडेचार लाख रुपयांपर्यंत व्याज परताव्याची तरतूद आहे. गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या गटाने राष्ट्रीयीकृत, खासगी अथवा सहकारी बँकांकडून घेतलेल्या कमाल ५० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या नियमित परतफेडीवर व्याज परतावा मिळणार आहे. पाच किंवा त्यापेक्षा अधिक सदस्यांच्या गटासाठी कमाल १५ लाख रुपयांपर्यंत व्याज परताव्याची तरतूद आहे.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी आणि ब्राह्मण समाजातील असणे आवश्यक आहे. अर्जदाराचे वय १८ ते ४५ वर्षे, तर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत असावे. महिलांसाठी ३० टक्के आणि दिव्यांगांसाठी तीन टक्के आरक्षणाची तरतूद आहे. अर्ज स्वीकृती शिबिरात सहभागी होऊन अर्ज सादर करण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे.
नोंदणी व अधिक माहितीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ, विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन, पुणे - ४११००१ (दूरध्वनी : ०२०-२९९८२१२५) ई-मेल : pavm.gov@gmail.com येथे संपर्क साधता येईल. महामंडळाच्या योजनांचा ब्राह्मण समाजातील गरजू युवक-युवतींनी अधिकाधिक लाभ घ्यावा, स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे आणि समाजाच्या आर्थिक सक्षमीकरणात योगदान करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष महेश सप्रे आणि उपाध्यक्ष ओंकार फडके यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी