
दोन गावांतील एका अभिलेखाचे ७५ टक्के, तर २७ गावांतील काही अभिलेखांचे अंशतः नुकसान संपूर्ण तालुक्याचे डिजिटायझेशन पूर्ण असल्याने नागरिकांच्या जमिनीच्या हक्कांना धोका नाही
इगतपुरी, २८ नोव्हेंबर (हिं.स.) : इगतपुरी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या अभिलेख कक्षाला २० नोव्हेंबर २०२६ रोजी लागलेल्या आगीत काही महत्त्वाच्या कागदी अभिलेखांचे नुकसान झाले असले, तरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. संपूर्ण इगतपुरी तालुक्यातील गावांच्या भूमी अभिलेखांचे स्कॅनिंग व डिजिटायझेशन यापूर्वीच पूर्ण करण्यात आले असून, सर्व महत्त्वाच्या नोंदी डिजिटल स्वरूपात सुरक्षित असल्याचा खुलासा भूमी अभिलेख कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
आगीच्या घटनेत दोन गावांतील एका अभिलेखाचे सुमारे ७५ टक्के, तर अन्य २७ गावांतील काही अभिलेखांचे अंशतः नुकसान झाले आहे. मात्र, संबंधित अभिलेखांच्या डिजिटल प्रती सुरक्षित असल्याने नागरिकांच्या जमिनीच्या हक्कांवर, अभिलेखांच्या उपलब्धतेवर अथवा भूमी अभिलेख विभागाच्या नियमित कामकाजावर कोणताही विपरीत परिणाम होणार नसल्याचे कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
तालुक्यातील सर्व गावांच्या भूमी अभिलेखांचे स्कॅनिंग आणि डिजिटायझेशन पूर्ण करण्यात आले असून, विभागाकडील अभिलेख महाभूमी पोर्टलवर नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे आगीमध्ये मूळ कागदी कागदपत्रांचे नुकसान झाले असले, तरी त्यामधील माहिती सुरक्षित राहिली आहे. विशेषतः जमिनीच्या मोजणीसह इतर संबंधित प्रशासकीय कामांवर या घटनेचा परिणाम होणार नसल्याचेही कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, या आगीच्या घटनेची भूमी अभिलेख प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून इगतपुरी पोलीस ठाण्यात अकस्मात जळीत र.नं. ०१/२०२६ अन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आगीमागील नेमके कारण तसेच घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
आगीच्या घटनेनंतर भूमी अभिलेख पूर्णपणे नष्ट झाल्याचा संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाला होता. मात्र, डिजिटल स्वरूपात नोंदींचे सुरक्षित जतन करण्यात आल्यामुळे नागरिकांच्या हिताला कोणतीही बाधा पोहोचलेली नाही, असे कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
डिजिटायझेशनमुळे मोठे नुकसान टळले
इगतपुरीतील या घटनेत कागदी अभिलेखांचे नुकसान झाले असले, तरी प्रशासकीय दूरदृष्टीतून यापूर्वीच करण्यात आलेल्या डिजिटायझेशनमुळे महत्त्वाच्या नोंदी सुरक्षित राहिल्या आहेत. भविष्यातील अभिलेख व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा वापर किती महत्त्वाचा आहे, हे या घटनेतून अधोरेखित झाले आहे.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI