
चंदीगड, ५ नोव्हेंबर (हिं.स.)केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, भारताच्या मतदार यादीत आणि या देशात घुसखोरांना स्थान नाही. ३ कोटी घुसखोरांच्या संरक्षणासाठी काँग्रेस देशभरात रॅली काढत आहे. कर्नाल येथे आयोजित 'लोकशाही वाचवा, अराजकता दूर करा' रॅलीला संबोधित करताना अमित शाह बोलत होते.
अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, ते पंतप्रधानांना चर्चेसाठी आव्हान देतात, पण संसदेत राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करणे टाळतात. गृहमंत्री म्हणाले की, एसआयआरच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सरकार लोकसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यास तयार आहे, पण राहुल गांधी यांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी हमी द्यावी की ते संसदेत या मुद्द्यावर चर्चा करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत.
अमित शाह म्हणाले की, घुसखोरांच्या संरक्षणासाठी सभा घेणारी काँग्रेस असा दावा करते की १३ कोटी मतांचे नुकसान होईल. सत्य हे आहे की २.८ कोटी मतदारांचा मृत्यू झाला आहे. ६२.५ कोटी मतदार इतर राज्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. देशात १ कोटी असे मतदार आहेत ज्यांची मते तीनपेक्षा जास्त ठिकाणी होती. ३ कोटी असे मतदार आहेत जे निवडणूक आयोगासमोर हजरही होत नाहीत आणि प्रत्यक्ष जमिनीवरही दिसत नाहीत. या घुसखोरांच्या संरक्षणासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे.
गृहमंत्री म्हणाले की, सरकार आधी या घुसखोरांना मतदार यादीतून काढून टाकेल आणि नंतर त्यांना देशातून हद्दपार करेल. जे हातात संविधान घेऊन फिरतात, ते रस्त्यावर संसदेबद्दल बोलतात. ते या घटनात्मक संस्थेचा सर्वाधिक अपमान करतात. काँग्रेसविरोधात घरोघरी जाऊन प्रचार तीव्र करण्याचे निर्देश देताना गृहमंत्री म्हणाले की, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सातत्याने निवडणुका हरत आहे आणि देशाच्या घटनात्मक संस्थांमधील तिचे प्रतिनिधित्व कमी होत आहे. अमित शाह यांनी हरियाणाचे विरोधी पक्षनेते हुडा यांच्यावर टीका करताना म्हटले की, २०२४ मध्ये काँग्रेसने मिठाई बनवून ठेवली होती, पण भाजप जिंकला. यानंतर महाराष्ट्र, बिहार आणि दिल्लीसह अनेक राज्यांमधून काँग्रेसचा सुपडा साफ झाला.
गृहमंत्री म्हणाले की, २०१४ आणि २०१९ मध्ये एसआयआर (SIR) नव्हता, तरीही काँग्रेस निवडणुका हरली. सततच्या पराभवांमुळे निराश झालेले काँग्रेस नेते एसआयआरला दोष देत आहेत. यापूर्वी, गृहमंत्री अमित शाह यांचे हरियाणात स्वागत करताना मुख्यमंत्री नायब सैनी म्हणाले की, आज हरियाणात काँग्रेसकडे कोणताही मुद्दा नाही. काँग्रेस नेते खोट्या गोष्टींचा डोंगर उभा करून लोकांची दिशाभूल करत आहेत. हरियाणा राज्य भाजप अध्यक्षा डॉ. अर्चना गुप्ता यांनी सांगितले की, या मोहिमेचा भाग म्हणून प्रत्येक कार्यकर्ता गावोगावी जाऊन काँग्रेसच्या खोटेपणाबद्दल लोकांना माहिती देत आहे. यावेळी केंद्रीय मंत्री आणि कर्नालचे खासदार मनोहर लाल, भाजपच्या प्रभारी स्मृती इराणी, हरियाणा विधानसभा अध्यक्ष हरविंदर कल्याण, कॅबिनेट मंत्री राव नरबीर सिंग, कृष्णा बेदी, कृष्ण लाल पनवार, महिपाल धांडा आणि इतर अनेक नेते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे