आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही; ईडी प्रकरणातील जामीन अर्जावरील सुनावणी नाकारली
नवी दिल्ली , 05 नोव्हेंबर (हिं.स.)।सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या नव्या मनी लाँडरिंग प्रकरणात त्यांनी जामिनाची मागणी के
आझम खान यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाही; ईडी प्रकरणातील जामीन अर्जावरील सुनावणी नाकारली


नवी दिल्ली , 05 नोव्हेंबर (हिं.स.)।सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यास नकार दिला. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या नव्या मनी लाँडरिंग प्रकरणात त्यांनी जामिनाची मागणी केली होती.

सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने आझम खान यांची याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे वर्ग केली. तसेच, या प्रकरणाची १६ नोव्हेंबर रोजी द्विसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी होईल, अशा सूचना उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना दिल्या.

सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाला १६ नोव्हेंबर रोजीच आझम खान यांच्या याचिकेवर अंतरिम आदेश देण्यासही सांगितले. आझम खान यांच्या वतीने बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ईडीच्या कारवाईमागे द्वेषभावना असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, त्यांची सुटका होणार होती, नेमक्या त्याच वेळी त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी पुढे म्हटले की, निवडणुका सुरू असताना त्यांना तुरुंगातच ठेवण्याचा त्यांचा उद्देश आहे. आझम खान यांच्या वकिलांनी सांगितले की, ७८ वर्षीय समाजवादी पक्षाच्या नेत्याला १ नोव्हेंबर रोजी जौहर ट्रस्टशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात गाझियाबाद येथील विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते.

ईडीने ३१ ऑक्टोबर रोजी मनी लाँडरिंग प्रकरणात आझम खान यांना अटक केली होती. दोन पॅनकार्ड बाळगल्याच्या कथित प्रकरणात रामपूर तुरुंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी आझम खान यांच्यासोबत त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम खान याचीही जामिनावर सुटका झाली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande