
जळगाव, ५ नोव्हेंबर (हिं.स.) : जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील वर्ग-१ चे उपविभागीय अधिकारी सतीश मनसुलाल शिसोदे यांच्या मालमत्तेची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तपासणी केली असता तब्बल ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८१ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. या कारवाईत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने, प्लॅटिनमचे दागिने तसेच स्थावर मालमत्तेची कागदपत्रे आढळली आहेत. या कारवाईमुळे जिल्हा परिषद वर्तुळात खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सतीश मनसुलाल शिसोदे (वय ५५) हे जळगाव जिल्हा परिषद बांधकाम विभागात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. जळगाव शहरातील स्वामी विवेकानंद सोसायटी, आदर्श नगर परिसरातील त्यांच्या निवासस्थानी एसीबीच्या पथकाने तपासणी केली. या तपासणीत त्यांच्या मालमत्तेचा मोठा तपशील समोर आला.
घरझडतीदरम्यान ७ लाख १७ हजार ९२० रुपयांची रोख रक्कम आढळून आली. तसेच आदर्श नगर परिसरातील दोन घरांची किंमत अनुक्रमे ४५ लाख आणि ६५ लाख रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. घरातील इतर मौल्यवान वस्तूंचाही मालमत्तेच्या तपशिलात समावेश करण्यात आला आहे.
बँक लॉकरमध्ये साडेतीन कोटींचे सोने
शिसोदे यांच्या जळगाव सहकारी बँकेतील लॉकरची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात मौल्यवान दागिने आढळले. यामध्ये २ हजार ५२४.१८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या बिस्किटांचा समावेश आहे. चेन, पेंडल, लॉकेट, बांगड्या आणि सोन्याच्या पट्ट्यांचा समावेश असलेल्या या सोन्याचे मूल्य ३ कोटी ५१ लाख ८९ हजार १५३ रुपये इतके असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय लॉकरमध्ये ११ हजार ६३३.७ ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू आढळल्या. चांदीची बिस्किटे, वाट्या, ताटे आणि इतर वस्तूंची किंमत १९ लाख ५३ हजार ९९१ रुपये आहे. विशेष म्हणजे, १०१.०२ ग्रॅम वजनाचे प्लॅटिनमचे दागिनेही आढळले असून त्यांचे मूल्य ३ लाख ५५ हजार २८६ रुपये आहे.
अशा प्रकारे बँक लॉकरमधील सोन्या-चांदीसह प्लॅटिनमच्या दागिन्यांची एकूण किंमत ३ कोटी ७४ लाख ९० हजार ४३० रुपये झाली आहे.
एकूण मालमत्ता ५.१६ कोटींची
घरझडती, बँक लॉकरमधील ऐवज, स्थावर मालमत्ता आणि इतर वस्तूंची एकत्रित किंमत ५ कोटी १६ लाख ८८ हजार ३८१ रुपये असल्याचे एसीबीच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर