
जळगाव, 05 नोव्हेंबर (हिं.स.) दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली असून बाजारपेठेत मिठाईला मोठी मागणी असते. मिठाई बनवण्यासाठी खव्याची मोठ्या प्रमाणात मागणी असताना जळगावात संशयित डुप्लिकेट खव्याचा मोठा साठा आढळून आला आहे. अहमदाबादहून ट्रॅव्हल्सने आणलेला २४० किलो खवा अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जप्त केला. या खव्याची किंमत तब्बल ६५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे दिवाळीच्या काळात मिठाई तयार करण्यासाठी खव्याला मोठी मागणी असते. या मागणीचा फायदा घेत गुजरातमधील अहमदाबाद येथून संशयास्पद खव्याचा साठा जळगावात आणला जात असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती.
या माहितीच्या आधारे प्रशासनाच्या पथकाने जळगाव शहरातील श्री बालाजी ट्रॅव्हल्सच्या कार्यालयाबाहेर छापा टाकत तपासणी केली.या तपासणीदरम्यान पथकाला २४० किलो संशयित खवा आढळून आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी संपूर्ण साठा ताब्यात घेतला. या खव्याची बाजारभावानुसार किंमत अंदाजे ६५ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. कारवाईनंतर अधिकाऱ्यांनी खव्याचे नमुने प्रयोगशाळेतील तपासणीसाठी घेतले असून, घटनास्थळी पंचनामा करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. दरम्यान, प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच खवा भेसळयुक्त किंवा बनावट असल्याचे स्पष्ट होणार आहे. तपासणीत भेसळ आढळल्यास संबंधितांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे. खवा नेमका कोणासाठी आणला होता? अहमदाबादहून जळगावात आणण्यात आलेला हा खवा शहरातील कोणत्या व्यापाऱ्याने किंवा मिठाई विक्रेत्याने मागवला होता, याचा शोध आता प्रशासनाकडून घेतला जात आहे. या साठ्यामागे आणखी कोणाचे संबंध आहेत का, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे मिठाई विक्रेते आणि भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर