महापालिकेची १४.८० लाखांची रोकड घेऊन बँकेचे दोन कर्मचारी पसार
Bank contract employees flee after stealing Rs 15 lakh deposited by Municipal Corporation
महापालिकेची १४.८० लाखांची रोकड घेऊन बँकेचे दोन कर्मचारी पसार


विविध विभागांतून जमा केलेली रक्कम बँकेत न भरता अपहार; गुन्हा दाखल

नाशिक, ०५ नोव्हेंबर (हिं.स.) : नाशिक महानगरपालिकेच्या विविध विभागांतून जमा केलेली लाखो रुपयांची रोकड बँकेत जमा न करता तिचा अपहार करून बँकेचे दोन कंत्राटी कर्मचारी पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोघांनी तब्बल १४ लाख ८० हजार ३३६ रुपयांची रोकड लंपास केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाच्या नाशिक सिटी बॅचचे अधिकारी वैभव शिवनाथ डोळे (वय ४४) यांनी याप्रकरणी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सुरेश हिरामण सोनकांबळे आणि अनुप सुरेश कुमावत अशी संशयित आरोपींची नावे असून, हे दोघे बँकेत दैनंदिन रोजगारावर काम करीत होते.

फिर्यादीनुसार, संशयितांनी महापालिकेच्या विविध विभागांतून रोख रक्कम जमा केली होती. यामध्ये सातपूर विभागातील ६ लाख १ हजार १३४ रुपये, नाशिकरोड विभागातील ३ लाख २६ हजार ८२५ रुपये, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एमआरआय सेंटरमधील ८३ हजार १ रुपये, गांधीनगर सेंटरमधील ४१ हजार २४ रुपये, इंदिरानगर विभागातील ४४ हजार ६१ रुपये आणि नवीन नाशिक विभागातील ३ लाख ८४ हजार २९१ रुपयांचा समावेश आहे.

अशा प्रकारे एकूण १४ लाख ८० हजार ३३६ रुपये रोख स्वरूपात जमा करून घेतल्यानंतर संशयितांनी ही रक्कम बँकेत भरली नाही. उलट, रकमेचा अपहार करून दोघेही पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोन्ही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर करीत आहेत.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande