लातूर - औराद शहाजानीत तिर्रट जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; सात जणांना पकडले
लातूर, 04 नोव्हेंबर, (हिं.स.)। निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रकमेसह तीन मोटारसायकली आणि पाच मोबाईल फोन असा एकूण २ लाख ५८ हजार ९२० र
जुगार अड्ड्यावर धाड


लातूर, 04 नोव्हेंबर, (हिं.स.)। निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे सुरू असलेल्या तिर्रट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत रोख रकमेसह तीन मोटारसायकली आणि पाच मोबाईल फोन असा एकूण २ लाख ५८ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार औराद शहाजानी येथील अनंत विठ्ठल भंडारे यांच्या शेतातील आखाड्यावर काही जण विनापरवाना पैशांची बाजी लावून तिर्रट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता सात जण जुगार खेळताना आणि खेळविताना आढळून आले.

यामध्ये अनंत विठ्ठल भंडारे (वय ६२), लक्ष्मण वसंत कांबळे (वय ५२), इरफान खुर्शिद मुल्ला (वय ३८), युनूस बशीर पटेल (वय ५२), खाजा जाकीर चौधरी (वय ३२), राजेसाब दस्तगीर सय्यद (वय ३५) आणि हैदर महेमुद कुरेशी (वय ३८, सर्व रा. औराद शहाजानी, ता. निलंगा) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळावरून २३ हजार ९२० रुपयांची रोख रक्कम, अंदाजे १ लाख ७० हजार रुपये किमतीच्या तीन मोटारसायकली आणि अंदाजे ६५ हजार रुपये किमतीचे पाच मोबाईल फोन असा एकूण २ लाख ५८ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलीस अमलदार प्रशांत विजयकुमार हांडे यांच्या फिर्यादीवरून औराद शहाजानी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८६/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यातील कलम १२(अ), ४ व ५ अंतर्गत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत बांगर यांच्या नेतृत्वाखाली औराद शहाजानी पोलिसांनी ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस अमलदार मनोज मोरे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande