
लातूर, 04 नोव्हेंबर, (हिं.स.)। जिल्ह्यात चंदनाच्या झाडांची अवैध तोडणी करून त्याचा गाभा आणि लाकडाचे तुकडे साठवून ठेवणाऱ्या चार आरोपींविरुद्ध चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तब्बल ५४० किलो चंदनासह एकूण ११ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक अमोल तांबे आणि अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाकूर तालुक्यातील आनंदवाडी येथे चापोली ते नायगाव रस्त्यावरील एका फार्म हाऊसलगतच्या शेतशिवारात ही कारवाई करण्यात आली. नरसिंग रामा बंदराळे (वय ५०, रा. आनंदवाडी, ता. चाकूर), वसंत भानुदास चांनकाणे (वय ४०), संतोष वैजनाथ चांनकाणे (वय ३५) आणि बालाजी भानुदास चांनकाणे (वय ४२, तिघेही रा. वाढवणा, ता. उदगीर) यांनी संगनमताने शासनाने तोडणीस प्रतिबंधित केलेल्या चंदनाच्या झाडांची अवैध तोडणी केल्याचे आढळून आले.
आरोपींनी चंदनाच्या झाडांची साल काढून त्यातील गाभा आणि लाकडाचे तुकडे तयार केले होते. पोलिसांनी तपासणी केली असता चार पोत्यांमध्ये ३० किलो चंदनाचा गाभा, ज्याची किंमत १ लाख ५० हजार रुपये, तर २८ पोत्यांमध्ये ५१० किलो चंदनाचे लाकडी तुकडे, ज्यांची किंमत १० लाख २० हजार रुपये, असा एकूण ५४० किलो चंदनाचा ११ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याशिवाय चंदनाची झाडे तोडण्यासाठी व साल काढण्यासाठी वापरण्यात येणारे चार लोखंडी वाकस, दोन लोखंडी छन्नी आणि दोन लोखंडी कुऱ्हाडीही पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी पोलीस अमलदार अनिल श्रीरामे यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५९४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०३(२), ३(५) तसेच भारतीय वन अधिनियम १९२७ मधील कलम ४१, ४२ अंतर्गत चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जी. एन. चामले करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis