रणजितसिंह मोहिते-पाटील यांची माघार नाही; उमेदवारीसाठी अपील दाखल
सोलापूर, 05 नोव्हेंबर, (हिं.स.)। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतरही माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह सात नेत्यांनी माघार न घेता कायदेशीर लढाई सुरू ठेवली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नि
Nsns


सोलापूर, 05 नोव्हेंबर, (हिं.स.)। सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतरही माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह सात नेत्यांनी माघार न घेता कायदेशीर लढाई सुरू ठेवली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान देत या नेत्यांनी पुणे विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले आहे. या अपिलांवर ६ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असल्याने सहनिबंधकांच्या निर्णयाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेच्या उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान कलम ८८ आणि कलम ११० (अ) अंतर्गत झालेल्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या कारणास्तव रणजितसिंह मोहिते-पाटील, संजयमामा शिंदे, सिद्धाराम म्हेत्रे, प्रशांत परिचारक, दिलीप माने, सुरेश हसापुरे आणि बबनराव आवताडे यांचे उमेदवारी अर्ज बाद करण्यात आले.

छाननीवेळी संबंधित नेत्यांच्या वतीने कायदेशीर बाजू मांडण्यात आली होती. २०१८ मध्ये संचालक मंडळ बरखास्त होण्यापूर्वीच राजीनामे दिले होते, तसेच कलम ८८ अंतर्गत निश्चित झालेली रक्कम भरण्याची तयारी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हे युक्तिवाद अमान्य केले.

त्यानंतर सातही नेत्यांनी पुणे विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल केले आहे. ६ नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीत त्यांच्या उमेदवारीबाबत काय निर्णय होतो, यावर निवडणुकीतील पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असणार आहेत.

दरम्यान, रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा अर्ज बाद झाला असला तरी धैर्यशील मोहिते-पाटील यांचा अर्ज वैध ठरला आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील मोहिते-पाटील कुटुंबाचे अस्तित्व कायम आहे.

अर्ज बाद होण्याची शक्यता असतानाही उमेदवारी दाखल करण्यामागे नेमकी कोणती रणनीती होती आणि अपिलाच्या माध्यमातून उमेदवारी पुन्हा मिळवण्यात हे नेते यशस्वी होणार का, याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande