
लातूर, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। दुष्काळाने ग्रामीण अर्थव्यवस्थेची घडी विस्कटली असताना, सरकारी योजनांच्या लाभार्थी यादीतून नावे कमी होण्याची प्रक्रिया अनेक कुटुंबांसाठी नवी चिंता बनली आहे. देवणी तालुक्यात आयकर (इन्कमटॅक्स) रिटर्न भरणाऱ्या नागरिकांची स्वस्त धान्य योजनेतील नावे वगळण्यात आली असून, तब्बल ९०० लाभार्थ्यांना रेशनच्या लाभापासून दूर व्हावे लागले आहे. आधीच उत्पन्नाचे मार्ग आटलेले असताना धान्याच्या आधारावरही मर्यादा आल्याने ग्रामीण
भागात या निर्णयाची चर्चा सुरू आहे.
शासनाकडून स्वस्त धान्य योजनेतील लाभार्थ्यांची पात्रता तपासण्यावर भर दिला जात आहे. आयकर रिटर्न भरणाऱ्या नागरिकांना योजनेतून वगळण्याच्या निकषानुसार देवणी तालुक्यातील ९०० नागरिकांची नावे कमी करण्यात आली आहेत.
पात्रता पडताळणीच्या प्रक्रियेत ही कारवाई करण्यात आली असली, तरी सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा परिणाम नेमका कोणत्या कुटुंबांवर होणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis