मुंबई पुस्तक महोत्सव संवेदना आणि माणुसकीचा महोत्सव - मुख्यमंत्री
मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। “समृद्ध समाजाची निर्मिती पुस्तकांमधून होते. समाजातील ज्ञानसंपदेच्या विस्ताराचे कार्य पुस्तकांनीच केले आहे. आजचे युग कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) आहे; मात्र जीवनातील संवेदना, प्रेम आणि भावना एआयला कळत नाहीत. पुस्तके मात्
Cm fadnavis


मुंबई, 24 नोव्हेंबर (हिं.स.)। “समृद्ध समाजाची निर्मिती पुस्तकांमधून होते. समाजातील ज्ञानसंपदेच्या विस्ताराचे कार्य पुस्तकांनीच केले आहे. आजचे युग कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) आहे; मात्र जीवनातील संवेदना, प्रेम आणि भावना एआयला कळत नाहीत. पुस्तके मात्र माणसाला संवेदनशील बनवतात आणि विचार करण्यास प्रवृत्त करतात. त्यामुळे मुंबई पुस्तक महोत्सव हा माझ्यासाठी संवेदना आणि माणुसकीचा महोत्सव आहे,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पसमध्ये आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी मुंबईत आता दरवर्षी पुस्तक महोत्सव आयोजित केला जाईल, अशी घोषणा केली.

यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, पोलीस आयुक्त देवेन भारती, महापौर ऋतु तावडे, न्यासाचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, मुख्य आयोजक अमित साटम, मुख्य संयोजक आचार्य पवन त्रिपाठी तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रविंद्र कुलकर्णी उपस्थित होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्वेता पांडा यांच्या ‘थोड़ी मय’, हिमांशु गुप्ता यांच्या ‘मेंटल हेल्थ फॉर टीनएजर्स’, पूजा राय यांच्या ‘अमर पुराण’ आणि अमृता बोहरा यांच्या ‘वीर गाथा’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

मुंबई पुस्तक महोत्सवाचे मुख्य आयोजक अमित साटम म्हणाले की, “चित्रपट, बॉलिवूड आणि फॅशन फेस्टिव्हलच्या मालिकेत आता मुंबईचा स्वतःचा पुस्तक महोत्सवही आहे.” तर आचार्य पवन त्रिपाठी यांनी महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने झालेल्या तरुणांच्या उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त करत, या महोत्सवामुळे तरुण पिढीचा स्क्रीन टाइम कमी होऊन वाचनाचा वेळ वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.

भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत यांच्या वतीने आयोजित हा महोत्सव २९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका आणि मुंबई विद्यापीठ हे या महोत्सवाचे सहयोगी आहेत. महोत्सवात ६०० हून अधिक पुस्तक स्टॉल्स असून विविध साहित्यप्रकार आणि भाषांमधील पुस्तकांचा मोठा संग्रह वाचकांसाठी उपलब्ध आहे. रविवारी महोत्सवस्थळी शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली. बालकांसाठी आयोजित विविध उपक्रमांमध्येही मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी सुमारे एक लाख पुस्तकप्रेमींनी भेट दिली.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, म्हणजेच २५ नोव्हेंबर रोजी देशातील उद्योगपती गौतम अदानी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. महोत्सवादरम्यान १०० हून अधिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये साहित्यिक संवाद, लेखकांशी संवाद, पुस्तक प्रकाशन, विविध विषयांवरील प्रदर्शन, बालकांसाठी उपक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. सर्व वयोगटातील नागरिकांमध्ये वाचनाची सवय विकसित करणे आणि पुस्तक संस्कृती अधिक बळकट करणे हा या उपक्रमांचा प्रमुख उद्देश आहे.

या महोत्सवात दिल्लीचे राज्यपाल तरनजीत सिंह संधू, आचार्य प्रशांत, पॅरालिम्पिकपटू दीपा मलिक, ॲड. उज्ज्वल निकम, गीतकार मनोज मुंतशिर, चित्रपट दिग्दर्शक चंद्रप्रकाश द्विवेदी, अभिनेत्री व लेखिका शेफाली शाह, अंतराळवीर शुभांशु शुक्ल, अरुणा ढेरे, शशिकांत सावंत, मयूर शाह, राजीव श्रीखंडे, साहित्यिक विश्वास पाटील, शरणकुमार लिंबाळे, अश्विन सांघी, आनंद नीलकंठन, अक्षत गुप्ता, मेधा भास्करन, अंजुम चोप्रा, अंशुल चतुर्वेदी, एहसान वजीर, निकिता ठाकूर, प्रफुल्ल बिल्लौरे इत्यादी मान्यवर वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande