
रायगड, 24 नोव्हेंबर, (हिं.स.)। छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक वारसा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्यांचा जागर करण्यासाठी राष्ट्रीय संविधान दिनानिमित्त किल्ले रायगडावर ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता हिरकणीवाडी, किल्ले रायगड येथील रायगड रोपवे परिसरात हा कार्यक्रम होणार आहे. ऐतिहासिक वारशाचे जतन, संविधानिक कर्तव्यांची जाणीव आणि पर्यावरण संवर्धन यांचा संगम साधणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या सोहळ्यानिमित्त किल्ले परिसरात स्वच्छता व पर्यावरण जनजागृती अभियान, सामूहिक संविधान उद्देशिका वाचन, संविधान प्रतिज्ञा, पर्यावरण संवर्धनाचा संकल्प तसेच सांस्कृतिक आणि लोककला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत राज्यातील ११ गड-किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोकणकडा मित्र मंडळ व सहयोगी संस्थांच्या वतीने किल्ले रायगड येथे सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
संविधानाने दिलेली मूल्ये, स्वातंत्र्याची जाणीव आणि ऐतिहासिक वारसा जतन करण्याची जबाबदारी तरुण पिढीमध्ये रुजविण्याचा या उपक्रमातून प्रयत्न केला जाणार आहे. या विशेष सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)