नवी इलेक्ट्रिक ‘जीएलसी’ भारतात तयार; ‘मर्सिडीज-बेंझ’च्या नव्या पर्वाची सुरुवात
पुणे, 05 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतातील सर्वाधिक पसंतीच्या लक्झरी कार उत्पादकांपैकी एक असलेल्या ‘मर्सिडीज-बेंझ’ने आज पुण्यातील चाकण येथील कारखान्यात नव्या ‘इलेक्ट्रिक जीएलसी’चे स्थानिक उत्पादन सुरू केले. ‘जीएलसी ४०० फोर-मॅटिक’ या बहुप्रतीक्षित कारचे
नवी इलेक्ट्रिक ‘जीएलसी’ भारतात तयार;  ‘मर्सिडीज-बेंझ’च्या नव्या पर्वाची सुरुवात


पुणे, 05 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतातील सर्वाधिक पसंतीच्या लक्झरी कार उत्पादकांपैकी एक असलेल्या ‘मर्सिडीज-बेंझ’ने आज पुण्यातील चाकण येथील कारखान्यात नव्या ‘इलेक्ट्रिक जीएलसी’चे स्थानिक उत्पादन सुरू केले. ‘जीएलसी ४०० फोर-मॅटिक’ या बहुप्रतीक्षित कारचे पहिले मॉडेल असेंब्ली लाइनवरून बाहेर आले. या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ‘मर्सिडीज-बेंझ एजी’च्या पर्यवेक्षकीय मंडळाचे अध्यक्ष मार्टिन ब्रुडरम्युलर, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष ओला कॅलेनियस, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी व व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ. यॉर्ग बुर्झर, ‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’चे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष अय्यर, तसेच कार्यकारी संचालक व ऑपरेशन्स प्रमुख व्यंकटेश कुलकर्णी उपस्थित होते. भारतातील ‘मर्सिडीज-बेंझ’साठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला.

भारतात पहिल्यांदाच ‘इलेक्ट्रिक जीएलसी’चे उत्पादन सुरू होणे, ही ‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’साठी महत्त्वाची बाब आहे. यातून कंपनीच्या कारखान्याची कार्यक्षमता, उत्पादनातील लवचिकता आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्याला दिले जाणारे महत्त्व दिसून येते. या कारखान्यात डिजिटल तंत्रज्ञान आणि रोबोटिक्सचा वापर केला जातो. येथे कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित उत्पादन यंत्रणा कार्यरत आहे. ‘मर्सिडीज-बेंझ’ची ‘इलेक्ट्रिक जीएलसी’ ही भारतातील या कंपनीची पहिली एसयूव्ही आहे. ती कंपनीच्या नव्या पिढीतील इलेक्ट्रिक वाहनांच्या ‘एमबी.ईए-एम’ या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. ही कार ८०० व्होल्टच्या ‘इलेक्ट्रिकल आर्किटेक्चर’वर आधारित आहे. एका चार्जमध्ये ती ७११ किलोमीटरपर्यंत धावू शकते (डब्ल्यूएलटीपी एकत्रित रेंज - एआरएआय). या कारमध्ये ‘मर्सिडीज-बेंझ ऑपरेटिंग सिस्टीम’ (एमबी.ओएस) देण्यात आली आहे.

लवचिक उत्पादन व्यवस्थेचा आदर्श : एकाच उत्पादन लाइनवर आयसीई आणि बीईव्ही मॉडेल्सचे उत्पादन

पुण्यातील चाकण येथील ‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’च्या कारखान्यात ‘इलेक्ट्रिक जीएलसी’चे उत्पादन कंपनीच्या इतर आयसीई मॉडेल्ससोबत एकाच लवचिक उत्पादन लाइनवर केले जाते. ‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’च्या एकाच कारखान्यात आयसीई आणि बीईव्ही या दोन्ही प्रकारच्या इंजिन प्रणाली असलेल्या विविध वाहन प्लॅटफॉर्मवरील मॉडेल्सचे उत्पादन केले जाते. ही कंपनीची खासियत आहे.

‘मेक इन इंडिया’ला तीन दशकांहून अधिक काळाची परंपरा

आतापर्यंत ‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’ने भारतात २ लाख ४० हजारांहून अधिक वाहनांची विक्री केली आहे. भारतातील कोणत्याही लक्झरी कार उत्पादकाच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक आहे. भारतात विकल्या गेलेल्या यापैकी बहुतांश वाहनांचे उत्पादन ‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’च्या कारखान्यातच झाले आहे. पुण्यातील चाकण येथील उत्पादन कारखान्यासाठी ‘मर्सिडीज-बेंझ’ने आतापर्यंत ३,२०० कोटी रुपयांची (सुमारे ३२० दशलक्ष युरो) गुंतवणूक केली आहे. २०२६ मध्ये कंपनीने यासाठी अतिरिक्त २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या निधीचा वापर नव्या उत्पादनांचे उत्पादन सुरू करण्यासाठी, कारखान्यातील कामकाजासाठी आणि उत्पादन प्रक्रियेत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी केला जाणार आहे. या कारखान्याला भारतातील सुमारे २० थेट पुरवठादारांकडून कच्च्या मालाचा पुरवठा केला जातो. कंपनीच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त, या भागातील पुरवठादार आणि सेवा पुरवठादारांकडील सुमारे १८,००० लोकांच्या रोजगारावरही ‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’चा प्रभाव आहे.

कारखान्यात डिजिटल तंत्रज्ञान, रोबोटिक्स आणि एआयचा वापर

‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’ आपल्या कामकाजाचा वेग आणि कार्यक्षमता वाढवीत आहे. तसेच, कोणत्याही अडचणी आल्या तरी त्यांचे निराकरण करून कामकाज सुरळीत सुरू ठेवण्याची कंपनीची क्षमता आहे. उत्पादनाचा दर्जा, कार्यक्षमता, निर्णय घेण्याची क्षमता आणि कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी कंपनीच्या कारखान्यात एआयवर आधारित १५हून अधिक प्रकल्प सुरू आहेत. कॅमेऱ्यांच्या मदतीने काम करणारी ‘व्हिजन एआय’ यंत्रणा उत्पादनाच्या दर्जावर सतत लक्ष ठेवते. त्यामुळे उत्पादन आणि कामाच्या प्रत्येक टप्प्यावर एकसारखा दर्जा राखण्यास मदत होते. पुरवठा साखळीमध्ये डेटा आधारित मॉडेल्सच्या मदतीने भविष्यातील विविध परिस्थितींचा अंदाज घेतला जातो. त्यामुळे संभाव्य अडचणी आधीच ओळखून त्यावर उपाय करता येतात. ‘एआय’वर आधारित डिजिटल साधनांमुळे कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढवण्यासही मदत होते. वेल्डिंग, रिव्हेटिंग आणि पेंटिंग यांसारखी महत्त्वाची कामे औद्योगिक रोबोट्सच्या मदतीने केली जातात. त्यामुळे ही कामे अधिक अचूकपणे होतात आणि त्यांचा दर्जाही कायम राखला जातो. या कारखान्यात ‘एआय’वर आधारित, एकमेकांशी जोडलेल्या उत्पादन यंत्रणांसोबत हाताने केलेल्या बारकाईच्या कामालाही महत्त्व दिले जाते.

भारतात ‘आयसीई जीएलसी’च्या यशस्वी प्रवासाला एक दशक पूर्ण

‘जीएलसी’ने २०१६ मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. तेव्हापासून या ‘एसयूव्ही’चे जवळपास २२,००० ग्राहक झाले आहेत. ‘मर्सिडीज-बेंझ’च्या सर्वाधिक यशस्वी एसयूव्ही मॉडेल्सपैकी ही एक आहे. नवी ‘इलेक्ट्रिक जीएलसी’ या यशस्वी मॉडेलचा वारसा पुढे नेत आहे. त्याचबरोबर ती ‘बीईव्ही’ या नव्या पिढीतील इलेक्ट्रिक वाहनांच्या श्रेणीत प्रवेश करीत आहे. आजचे ग्राहक डिजिटल तंत्रज्ञानाशी परिचित आहेत. सहज वापरता येणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाला ते प्राधान्य देतात. या ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन ही कार तयार करण्यात आली आहे. जागतिक बाजारपेठेत ‘इलेक्ट्रिक जीएलसी’ला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. भारतातही ‘मर्सिडीज-बेंझ इंडिया’ला असाच प्रतिसाद मिळाला आहे. या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे भारतातील सादरीकरण होण्यापूर्वीच कंपनीला ग्राहकांकडून ५५० हून अधिक नोंदणी मिळाल्या. ही नोंदणी सुरू झाल्यानंतर पहिल्या ३६ तासांतच हा प्रतिसाद मिळाला. ‘इलेक्ट्रिक जीएलसी’च्या ग्राहकांसाठी कारची डिलिव्हरी नोव्हेंबर २०२६ च्या मध्यापासून सुरू होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande