
लातूरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल
लातूर, ०६ नोव्हेंबर (हिं.स.) : अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपीला लातूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालय क्रमांक ३ ने पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच आरोपीला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
गोविंद साधू नाईकवाडे (वय ५०, रा. उजळंब, ता. चाकूर, जि. लातूर) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २१ ऑक्टोबर २०२४ रोजी चाकूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना घडली होती. याप्रकरणी पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८८/२०२४ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५(२), ३३३ तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांनी केला. तपासादरम्यान संकलित केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. विशेष पोक्सो खटला क्रमांक १५३/२०२४ मध्ये सुनावणी पूर्ण झाल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालय क्रमांक ३ चे न्यायाधीश एस. ए. सय्यद यांनी आरोपीला दोषी ठरवून पाच वर्षांचा सश्रम कारावास आणि पाच हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. या खटल्यात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मंगेश महिंद्रकर यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. पैरवी अंमलदार म्हणून पोलीस हवालदार चंद्रकांत राचमाळे आणि प्रमोद तरडे यांनी काम पाहिले. तसेच ट्रायल मॉनिटरिंग सेलचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशंकर मनाळे यांनी पोलीस निरीक्षक बालाजी भंडे यांच्या नेतृत्वाखाली न्यायालयीन प्रक्रियेचा पाठपुरावा केला.
बालकांविरुद्धच्या लैंगिक गुन्ह्यांमध्ये प्रभावी तपास, सक्षम न्यायालयीन पैरवी आणि ट्रायल मॉनिटरिंग सेलच्या समन्वयातून दोषींना शिक्षा मिळवून देण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस कटिबद्ध असल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis