
प्रत्येकी २,५०० रुपयांचा दंड; जखमी फिर्यादीला ५ हजारांची नुकसानभरपाई
लातूर, ०६ नोव्हेंबर (हिं.स.) : शेतजमिनीच्या वादातून ज्येष्ठ नागरिकास मारहाण करून दुखापत केल्याप्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना प्रत्येकी २ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला असून, जखमी फिर्यादीस ५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
मौजे गादवड, ता. जि. लातूर येथील शेतशिवारात शेतीच्या कारणावरून झालेल्या वादातून नवनाथ विठ्ठल भिसे यांना मारहाण करून दुखापत करण्यात आली होती. याप्रकरणी २३ जुलै २०२० रोजी मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४३/२०२० अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ आणि ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणात अनिकेत उर्फ गणेश भारत भिसे, भारत निवृत्ती भिसे आणि महानंदा भारत भिसे (तिघेही रा. गादवड, ता. जि. लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार व्ही. टी. चौगुले यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. आरसीसी क्रमांक ८६६/२०२० अन्वये लातूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली.
सुनावणीअंती उपलब्ध पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती नागरगोजे यांनी तिन्ही आरोपींना भारतीय दंड संहितेच्या कलम ३२४, ३२३ आणि ३४ अन्वये दोषी ठरवले.
न्यायालयाने प्रत्येक आरोपीला २ हजार ५०० रुपये, असा एकूण ७ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. तसेच जखमी फिर्यादी नवनाथ विठ्ठल भिसे यांना ५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता श्रीमती सूर्यवंशी यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवीचे काम पोलीस हवालदार इम्रान शेख यांनी पाहिले. मुरुड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील अंधारे यांनी न्यायालयीन प्रक्रियेवर देखरेख ठेवली.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis