
लातूर, 06 नोव्हेंबर (हिं.स.)।
उदगीर शहरातील जळकोट रोडवरील बोधन नगरातील घराचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून आतमध्ये प्रवेश केला. दोन सोन्याच्या अंगठ्या आणि रोख रक्कमसह एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज पळविला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोधन नगर भागातील एका घराला कुलूप लावून घरमालक बाहेरगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील कपाटातील सामानाची उचकापाचक करून दोन सोन्याच्या अंगठ्या, ज्यांची एकूण किंमत २ लाख ८० हजार रुपये आहे, तसेच रोख १० हजार रुपये असा एकूण २ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज पळविला. त्याचबरोबर चोरट्यांनी घरातील काही कागदपत्रांचीही उचकापाचक केली आहे.
याप्रकरणी जयश्री संतोष चोले यांनी तक्रार दिली असून, तक्रारीवरून बुधवारी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis