ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाच्या सल्लागार प्रशिक्षकपदी माईक हसी यांची नियुक्ती
सिडनी, 06 नोव्हेंबर (हिं.स.)। ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज माइक हसी या महिन्यात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेपासून राष्ट्रीय संघासोबत सल्लागार प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी याबाबत घोषणा के
Sports Cricket Hussey Australia Consultant Coach


सिडनी, 06 नोव्हेंबर (हिं.स.)। ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज माइक हसी या महिन्यात इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेपासून राष्ट्रीय संघासोबत सल्लागार प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी याबाबत घोषणा केली. पुढील वर्षी होणाऱ्या ॲशेस मालिकेसह दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्यात येणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठीही हसी संघाचा सल्लागार प्रशिक्षक असेल.

५१ वर्षीय हसी याची २०२८ मध्ये होणाऱ्या दोन मोठ्या स्पर्धांसाठीही ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाचा टी-२० सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये प्रस्तावित टी-२० विश्वचषकाचा समावेश आहे. या भूमिकेत तो स्पर्धेच्या रणनीतीची आखणी करणे, प्रतिस्पर्धी संघांची माहिती गोळा करणे, प्रतिभावान खेळाडूंची निवड करणे आणि कामगिरीशी संबंधित बाबींवर तज्ज्ञ सल्ला देणार आहे.

हसी जवळपास तातडीने आपली जबाबदारी स्वीकारणार आहे. या महिन्याच्या अखेरीस इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेसह या हंगामात न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतही तो ऑस्ट्रेलियन संघाला प्रशिक्षणासाठी सहकार्य करणार आहे. गेल्या काही वर्षांतही त्याने ऑस्ट्रेलियन संघासोबत अशाच प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. गेल्या तीन वर्षांत इंग्लंड, भारत आणि पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकांपूर्वी पर्थ येथे झालेल्या संघाच्या सराव सत्रातही तो सहभागी झाला होता.

२०१६ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर हसीने प्रशिक्षण क्षेत्रात मोठा अनुभव मिळवला आहे. तो ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या राष्ट्रीय संघांच्या प्रशिक्षण पथकाचा सदस्य राहिला आहे. २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेला टी-२० विश्वचषक जिंकणाऱ्या इंग्लंड संघातही तो मॅथ्यू मॉट यांच्या प्रशिक्षण पथकाचा सदस्य होता. याशिवाय स्टीफन फ्लेमिंग यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाचा तो दीर्घकाळ फलंदाजी प्रशिक्षक होता. याच वर्षी द हंड्रेड स्पर्धेत त्याने वेल्श फायर संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारीही सांभाळली.

हसीने सांगितले की, ऑस्ट्रेलियन संघासोबत अधिकृत आणि महत्त्वपूर्ण भूमिकेत काम करण्याची संधी मिळणे ही आनंदाची बाब आहे. तो म्हणाला, “या संघाने अलीकडच्या वर्षांत अनेक यश मिळवले आहेत. आगामी रोमांचक आणि आव्हानात्मक काळात प्रशिक्षण पथक आणि खेळाडूंसाठी उपयुक्त योगदान देता येईल, अशी मला आशा आहे.”

ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी हसीच्या नियुक्तीचे स्वागत केले. ते म्हणाले की, हसी यापूर्वीही संघाच्या प्रशिक्षण पथकाचा महत्त्वाचा सदस्य राहिला आहे. त्याचा अनुभव आणि कौशल्य सध्याच्या प्रशिक्षकांसह खेळाडूंसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. विविध प्रकारचे क्रिकेट, स्पर्धा आणि देशांमध्ये खेळाडू तसेच प्रशिक्षक म्हणून मिळवलेले त्याचे कौशल्य आणि वैयक्तिक गुण संघासाठी महत्त्वाचे आहेत.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय संघांचे महाव्यवस्थापक बेन ऑलिव्हर यांनी सांगितले की, टी-२० सल्लागार म्हणून हसी स्पर्धेची रणनीती आखणे, प्रतिस्पर्धी संघांचे विश्लेषण करणे, खेळाडूंचा शोध घेणे आणि कामगिरीशी संबंधित विविध बाबींवर आपला तज्ज्ञ सल्ला देणार आहे.

हसीने २००५ ते २०१३ या कालावधीत ऑस्ट्रेलियासाठी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये एकूण ३०२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. २००७ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचा तसेच २००६-०७ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या ॲशेस मालिकेत ५-० असा विजय मिळवणाऱ्या संघाचा तो सदस्य होता. त्याने ७९ कसोटी सामन्यांमध्ये ५१ पेक्षा अधिकच्या सरासरीने धावा केल्या.

२०१० च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पाकिस्तानविरुद्ध खेळलेली त्याची २४ चेंडूंमध्ये नाबाद ६० धावांची खेळी आजही संस्मरणीय मानली जाते. त्याच्या या वादळी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने कठीण परिस्थितीतून पुनरागमन करत सामना जिंकला होता.

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक

- पहिला एकदिवसीय सामना : १३ नोव्हेंबर, पर्थ स्टेडियम.

- दुसरा एकदिवसीय सामना : १५ नोव्हेंबर, ॲडलेड ओव्हल.

- तिसरा एकदिवसीय सामना : १८ नोव्हेंबर, बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande