
नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर (हिं.स.)। भारतीय शेअर बाजारात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तेजीची जोरदार आतषबाजी पाहायला मिळाली. सलग सातव्या दिवशी बाजाराने वाढीची घोडदौड कायम ठेवत गुंतवणूकदारांना आनंदाची बातमी दिली. जागतिक बाजारात घसरणीचे वातावरण आणि अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांमध्ये मोठी पडझड होत असतानाही भारतीय बाजाराने मात्र दमदार कामगिरी केली. खासगी बँकिंग आणि वाहन क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांमध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने मोठी झेप घेतली. विशेष म्हणजे, २७ फेब्रुवारीनंतर प्रथमच सेन्सेक्सने ८१ हजारांचा, तर निफ्टीने २५ हजारांचा टप्पा ओलांडला. दिवसअखेर सेन्सेक्स २.१७ टक्के आणि निफ्टी २.०१ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.
शुक्रवारी सकाळी बाजाराची सुरुवात किरकोळ वाढीसह झाली होती. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १०३.६५ अंकांच्या वाढीसह ७९,४१३.६६ अंकांवर खुला झाला. मात्र, व्यवहार सुरू होताच नफावसुली आणि विक्रीचा दबाव वाढल्याने सेन्सेक्स २९३.९६ अंकांनी घसरून ७९,0१६.०५ अंकांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला. त्यानंतर खासगी बँकिंग आणि वाहन क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांच्या समभागांमध्ये जोरदार खरेदी सुरू झाली. या खरेदीच्या जोरावर सेन्सेक्सने घसरणीतून सावरत मोठी उसळी घेतली. दिवसाच्या नीचांकी पातळीवरून तब्बल २,१११.९७ अंकांची सुधारणा करत सेन्सेक्स १,७१८.०१ अंकांच्या वाढीसह ८१,0२८.०२ अंकांवर बंद झाला.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीची सुरुवात २४, ५३८.२० अंकांवर झाली. सुरुवातीच्या विक्रीमुळे निफ्टी १४८.५५ अंकांनी घसरून २४,३८८.०५ अंकांपर्यंत खाली आला होता. मात्र, त्यानंतर खरेदीदार सक्रिय झाल्याने बाजारात तेजी परतली. खासगी बँका आणि वाहन कंपन्यांच्या समभागांमधील खरेदीमुळे निफ्टीने दिवसाच्या नीचांकी पातळीवरून ६४२.३० अंकांची झेप घेतली अखेर ४९३.७५ अंकांच्या वाढीसह २५,0३०.३५ अंकांवर व्यवहाराची समाप्ती केली.
क्षेत्रनिहाय व्यवहारात खासगी बँकिंग क्षेत्राने सर्वाधिक चमक दाखवली. निफ्टीचा खासगी बँक निर्देशांक तीन टक्क्यांहून अधिक वधारला. औषधनिर्माण आणि सरकारी बँकांच्या निर्देशांकातही अर्ध्या टक्क्यांहून अधिक वाढ झाली. मात्र, प्रमुख निर्देशांकांमध्ये तेजी असतानाही मध्यम आणि लघु कंपन्यांच्या समभागांमध्ये नफावसुली कायम राहिली. निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक ०.८२ टक्क्यांनी घसरला, तर मिडकॅप १०० निर्देशांकात ०.०२ टक्क्यांची किरकोळ घसरण झाली.
बाजारातील या ऐतिहासिक तेजीचा गुंतवणूकदारांच्या संपत्तीवर मात्र मर्यादित परिणाम झाला. गुरुवारी मुंबई शेअर बाजारातील सूचिबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य ५ कोटी २ लाख ७० हजार ३७३.३४ कोटी रुपये होते. शुक्रवारी ते वाढून ५ कोटी ३ लाख १० हजार ५१८.६० कोटी रुपयांवर पोहोचले. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ४० हजार १४५.२६ कोटी रुपयांची वाढ झाली.
समभागांच्या कामगिरीत महिंद्रा अँड महिंद्राने ५.११ टक्क्यांच्या वाढीसह आघाडी घेतली. आयसीआयसीआय बँक ४.७५ टक्के, एचडीएफसी लाईफ ३.९५ टक्के, एचडीएफसी बँक ३.७२ टक्के आणि टायटन कंपनी ३.४२ टक्क्यांनी वधारली. दुसरीकडे, टीएमपीव्हीमध्ये ०.५८ टक्के, आयशर मोटर्समध्ये ०.५६ टक्के आणि पॉवर ग्रिडमध्ये ०.४३ टक्क्यांची घसरण झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांकांनी धनत्रयोदशीला नवा उत्साह निर्माण केला असला, तरी मध्यम आणि लघु कंपन्यांच्या समभागांमधील विक्रीमुळे बाजारातील तेजी सर्वसमावेशक नसल्याचे स्पष्ट झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule