
वॉशिंग्टन, 07 नोव्हेंबर (हिं.स.)। इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाबाबत अमेरिकेने मोठे पाऊल उचलले आहे. अमेरिकन सरकारने इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित गोपनीय माहिती देणाऱ्या व्यक्तीला २० मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे १६६ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. यासोबतच माहिती देणाऱ्या व्यक्तीला गरज पडल्यास एखाद्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून तेथे स्थायिक होण्याची संधीही दिली जाऊ शकते. अमेरिकन सेंट्रल कमांड (सेंटकॉम)ने शुक्रवारी याबाबत माहिती दिली.
बांगलादेशातील इंग्रजी दैनिक वृत्तपत्र 'द डेली स्टार'ने दिलेल्या वृत्तानुसार, सेंटकॉमने समाजमाध्यमांवरील एक्स या व्यासपीठावर पोस्ट करून सांगितले की, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचा 'रिवॉर्ड्स फॉर जस्टिस' हा कार्यक्रम इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळवू इच्छित आहे. यामध्ये अण्वस्त्र केंद्रे, उपकरणे, घडामोडी आणि अणुशास्त्रज्ञांसह या कार्यक्रमाशी संबंधित व्यक्तींच्या माहितीचा समावेश आहे.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानुसार, अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा आणि नागरिकांच्या हितांचे संरक्षण करण्यास मदत करू शकतील, अशा माहिती मिळवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. हा बक्षीस कार्यक्रम १९८४ मध्ये सुरू करण्यात आला होता. तसेच इराणकडून आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (आयएईए) सुरक्षा नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे संस्थेकडे इराणमधील सेंट्रीफ्यूजसारख्या महत्त्वाच्या उपकरणांचे उत्पादन आणि साठ्याच्या सातत्यपूर्ण देखरेखीशी संबंधित माहिती उपलब्ध नसल्याचेही सांगण्यात आले.
मात्र, २० दशलक्ष डॉलरचे बक्षीस मिळवण्यासाठी नेमक्या कोणत्या स्तरावरील माहिती आवश्यक आहे, हे अमेरिकन प्रशासनाने स्पष्ट केलेले नाही. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की, इराण युद्ध संपवण्यासाठी करार करू इच्छित आहे. शुक्रवारी रात्री फ्लोरिडातील वेस्ट पाम बीच येथे बोलताना त्यांनी सांगितले की, अमेरिकेने इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर हल्ला केला नसता, तर इस्रायलचे अस्तित्व धोक्यात आले असते.
ट्रम्प म्हणाले, ''आम्ही सध्या त्यांच्याशी चर्चा करत आहोत. त्यांना कोणत्याही परिस्थितीत करार करायचा आहे.'' अमेरिकेच्या लष्करी कारवाईमुळे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे मोठे नुकसान झाल्याचाही दावा त्यांनी केला. दुसरीकडे, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनीही या आठवड्यात सांगितले होते की, त्यांचे सरकार चर्चेच्या माध्यमातून या संकटावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे. युद्ध पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त होत असताना आंतरराष्ट्रीय मध्यस्थांनी राजनैतिक प्रयत्नांना वेग दिला आहे.
यापूर्वी ट्रम्प यांनी मध्य इराणमध्ये असलेल्या संशयित अण्वस्त्र केंद्र 'पिकएक्स माउंटन'चाही उल्लेख केला होता. मात्र, इराणने तेथे कोणतीही अण्वस्त्र सुविधा अस्तित्वात असल्याचा दावा फेटाळून लावला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule