रशिया-अमेरिका-युक्रेन दरम्यान १०-११ नोव्हेंबरला अबूधाबी येथे त्रिपक्षीय चर्चा होणार : पुतिन
मॉस्को, 07 नोव्हेंबर (हिं.स.)। रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेले युद्ध संपविण्याच्या दिशेने पुन्हा एकदा राजनैतिक प्रयत्नांना वेग आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुष्टी केली आहे की, रशिया, अमेरिका आणि युक्रेनच्या प्रतिनिधी
RUSSIA AMERICA UKRAINE TRILATERAL TALKS IN ABU DHA


मॉस्को, 07 नोव्हेंबर (हिं.स.)। रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेले युद्ध संपविण्याच्या दिशेने पुन्हा एकदा राजनैतिक प्रयत्नांना वेग आला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पुष्टी केली आहे की, रशिया, अमेरिका आणि युक्रेनच्या प्रतिनिधी मंडळांमध्ये चर्चेची पुढील फेरी १० आणि ११ नोव्हेंबर रोजी संयुक्त अरब अमिरातीची राजधानी अबूधाबी येथे होणार आहे. युद्ध संपविणे, तणाव कमी करणे आणि शांततेचा मार्ग शोधणे, हा या चर्चेचा मुख्य उद्देश आहे.

रशियाची सरकारी वृत्तसंस्था तासच्या हवाल्याने रशियाचे आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी नेटवर्क रशिया टुडे (आरटी) तसेच तुर्कियेची सरकारी वृत्तसंस्था अनाडोलू यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांनी शुक्रवारी रशियाच्या सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत या चर्चेची माहिती दिली. मंगळवारी चर्चेला सुरुवात होण्याची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी रशियन प्रतिनिधी मंडळात सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांनाही बैठकीला बोलावले होते.

क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांच्या माहितीनुसार, अबूधाबी येथे होणाऱ्या चर्चेत रशियन प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व राष्ट्राध्यक्षांचे सहकारी व्लादिमीर मेडिन्स्की करणार आहेत. यापूर्वीही मेडिन्स्की यांनी युक्रेनसोबत झालेल्या शांतता चर्चेच्या अनेक फेऱ्यांमध्ये रशियाचे प्रतिनिधित्व केले आहे.

या बैठकीला रशियाच्या सुरक्षा परिषदेशी संबंधित अनेक वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. यामध्ये युरी उशाकोव्ह, मिखाईल गलुजिन, सर्गेई रयाबकोव्ह आणि लष्करी गुप्तचर विभागाचे प्रमुख इगोर कोस्त्युकोव्ह यांचा समावेश होता.

अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी यापूर्वी सांगितले होते की, या चर्चेत युद्धानंतरची सुरक्षा व्यवस्था, तणाव कमी करण्याचे उपाय, मानवतावादी मदत आणि कायमस्वरूपी शांततेच्या दिशेने पुढील पावले यावर चर्चा होणार आहे.

अमेरिकेच्या दृष्टीने युद्ध संपविण्याच्या प्रयत्नांमध्ये ही चर्चा महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, रशियाने युरोपीय देशांच्या थेट सहभागाला विरोध केला आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यापूर्वीही आपला देश चर्चेसाठी तयार असल्याचे सांगत आले आहेत. मात्र, तात्पुरत्या युद्धविरामाच्या बाजूने नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कायमस्वरूपी शांतता करारामध्ये संघर्षाची मूळ कारणे आणि रशियाच्या सुरक्षाविषयक चिंतांचाही समावेश असणे आवश्यक असल्याचे मॉस्कोचे म्हणणे आहे. अबूधाबी येथे होणारी ही त्रिपक्षीय चर्चा रशिया-युक्रेन युद्ध संपविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण ठरू शकते. मात्र, दोन्ही देशांमधील मतभेद लक्षात घेता, कोणत्याही ठोस करारापर्यंत पोहोचणे हे अद्याप मोठे आव्हान कायम आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande