बालेन्द्र शाह भारत दौऱ्यावर मोदींसोबत दिल्लीहून जनकपूर-अयोध्या रेल्वे सेवेचा करणार शुभारंभ
काठमांडू, 07 नोव्हेंबर (हिं.स.)। नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या हस्ते अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे संयुक्त उद्घाटन करण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये अयोध्या ते जनकपूरधाम रेल्वे
NEPAL PM INDIA VISIT PROJECTS


काठमांडू, 07 नोव्हेंबर (हिं.स.)। नेपाळचे पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्या प्रस्तावित भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या हस्ते अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांचे संयुक्त उद्घाटन करण्याची तयारी सुरू आहे. यामध्ये अयोध्या ते जनकपूरधाम रेल्वेसेवेचाही समावेश आहे. नेपाळचे पंतप्रधान शाह यांच्या २३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या भारत दौऱ्याची तयारी सुरू आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी काठमांडूला भेट दिली होती. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पंतप्रधानांच्या भारत दौऱ्याच्या कार्यक्रमपत्रिकेबाबत प्राथमिक चर्चा केली होती.

जनकपूरधाम-अयोध्या रेल्वेसेवेचे उद्घाटन

पंतप्रधान शाह यांच्या भारत दौऱ्यादरम्यान भगवान राम यांची जन्मभूमी अयोध्या आणि माता सीता यांची जन्मभूमी जनकपूरधाम यांना रेल्वेसेवेने जोडण्याच्या योजनेला हिरवा कंदील दाखवला जाऊ शकतो. मधेश प्रदेशाची राजधानी असलेल्या जनकपूरधामपासून भगवान राम यांची जन्मभूमी अयोध्येपर्यंत प्रस्तावित रेल्वेसेवेची गुरुवारी चाचणीही घेण्यात आली.

भारताच्या अयोध्येपासून नेपाळमधील जनकपूरधामपर्यंत डब्ल्यूडीपी ४डी ४०४०३ क्रमांकाचे इंजिन आणि १७ डब्यांच्या भारतीय रेल्वेगाडीच्या माध्यमातून तांत्रिक चाचणी घेण्यात आली. नेपाळ रेल्वे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ६७ भारतीय तांत्रिक तज्ज्ञांच्या पथकाने रेल्वेमार्गाची स्थिती आणि रेल्वेगाडीचा वेग यांसह विविध तांत्रिक बाबींची पाहणी केली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पंतप्रधान शाह आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली येथूनच संयुक्तपणे या रेल्वेसेवेचे उद्घाटन करण्याची योजना आहे. याच पार्श्वभूमीवर तयारीला वेग देण्यात आला आहे.

पहिल्या टप्प्यात जनकपूरधाम-अयोध्या रेल्वेसेवा आठवड्यातून एक दिवस चालवण्याची तयारी आहे. प्रस्तावित व्यवस्थेनुसार, रेल्वेगाडी अयोध्येहून रवाना होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी जनकपूरधाम येथे पोहोचेल. त्याचप्रमाणे जनकपूरधामहून संध्याकाळी सुटणारी रेल्वेगाडी दुसऱ्या दिवशी सकाळी अयोध्येत पोहोचेल. भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वीही जनकपूरधाम आणि अयोध्या यांना रेल्वे संपर्काने जोडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या प्रकल्पातील त्यांची विशेष रुची लक्षात घेऊन पंतप्रधान शाह यांच्या भारत दौऱ्यादरम्यान या सेवेचे उद्घाटन करण्याची तयारी केली जात आहे.

नेपाळ पोलीस प्रशिक्षण केंद्राचेही उद्घाटन

दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या हस्ते नेपाळमधील काभ्रे जिल्ह्यातील पनौती येथे निर्माणाधीन असलेल्या राष्ट्रीय पोलीस प्रशिक्षण संस्थेचेही संयुक्त उद्घाटन करण्याची तयारी आहे. हे आधुनिक प्रशिक्षण केंद्र आता बांधकामाच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. भारताकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या १० अब्ज १ कोटी ५१ लाख नेपाळी रुपयांच्या (मूल्यवर्धित कराव्यतिरिक्त) खर्चातून या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. प्रकल्पाचे ९५ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे.

पनौती येथे ६२ बिघ्यांहून अधिक जमिनीवर राष्ट्रीय पोलीस प्रशिक्षण संस्थेची उभारणी करण्यात येत आहे. या अंतर्गत एकूण ६७ भौतिक संरचना उभारण्यात आल्या आहेत. सध्या महाराजगंज येथे सुरू असलेली राष्ट्रीय पोलीस प्रशिक्षण संस्था पनौती येथे स्थलांतरित करण्याच्या योजनेनुसार, नेपाळी दिनदर्शिकेतील २०५२ या वर्षात जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाली होती. आता हा प्रकल्प पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे. पंतप्रधान कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनही दोन्ही देशांचे पंतप्रधान संयुक्तपणे करू शकतात.

भैरहवा येथील एकात्मिक तपासणी नाक्याचे उद्घाटन प्रस्तावित

पंतप्रधान शाह यांच्या भारत दौऱ्यादरम्यान भैरहवा येथे निर्माणाधीन असलेल्या एकात्मिक तपासणी नाक्याचेही उद्घाटन करण्याची तयारी आहे. भैरहवा सीमा शुल्क कार्यालयाचे प्रमुख हरिहर पौडेल यांच्या माहितीनुसार, नेपाळ-भारत व्यापार अधिक सुव्यवस्थित आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने भारत सरकारच्या सहकार्याने तयार करण्यात येत असलेला हा प्रकल्प आता पूर्णत्वाच्या जवळ पोहोचला आहे.

भैरहवा येथील एकात्मिक तपासणी नाक्याचे बांधकाम भारतीय कंपनी केएसएम वसीर मोहम्मद अँड सन्सने २०२३ मध्ये सुरू केले होते. पौडेल यांच्या म्हणण्यानुसार, बांधकाम करणारी कंपनी प्रकल्पाचे काम पूर्ण करून तो नेपाळ सरकारकडे हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेत आहे.

त्यांनी सांगितले की, एकात्मिक तपासणी नाक्याच्या मुख्य संरचनांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र, काही किरकोळ कामे अद्याप बाकी आहेत. इमारत हस्तांतरित होताच त्याचे कामकाज सुरू होणार नाही. त्यासाठी कार्यालयीन कामकाजाशी संबंधित आवश्यक व्यवस्था करावी लागणार आहे. पौडेल म्हणाले, 'उद्घाटनानंतरही हे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू होण्यासाठी काही महिने लागू शकतात.'

या एकात्मिक तपासणी नाक्याच्या बांधकामाचे कंत्राट १६१ कोटी ७६ लाख भारतीय रुपयांना देण्यात आले होते. या बांधकामासाठी १७ वर्षांपूर्वीच ५२ बिघे जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले होते. येथे आयातीसाठी सुमारे ७०० आणि निर्यातीसाठी ३००, अशा एकूण १ हजार मालवाहू ट्रकच्या पार्किंगची सुविधा विकसित करण्यात आली आहे.

लुंबिनी येथील बौद्ध विहाराचेही संयुक्त उद्घाटन होणार

पंतप्रधान शाह यांच्या भारत दौऱ्यादरम्यान लुंबिनी येथे उभारण्यात आलेल्या बौद्ध विहाराचेही दोन्ही देशांचे पंतप्रधान संयुक्तपणे उद्घाटन करू शकतात. या बौद्ध विहाराचे भूमिपूजन भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे २०२२ मध्ये बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने लुंबिनी दौऱ्यादरम्यान केले होते. आता या विहाराचे बांधकाम पूर्ण झाले आहे. लुंबिनी विकास निधी विविध देशांना आपली बौद्ध संस्कृती आणि परंपरा दर्शवणारे विहार उभारण्याची परवानगी देतो. याच उपक्रमांतर्गत भारतानेही कमळाच्या फुलाच्या आकाराचा बौद्ध विहार उभारला आहे. लुंबिनी विकास निधीचे प्रवक्ते ज्ञानिन राई यांच्या माहितीनुसार, या विहाराचे बांधकाम भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाने केले आहे.

पंतप्रधान बालेन्द्र शाह यांच्या भारत दौऱ्यादरम्यान या बौद्ध विहाराचे उद्घाटन करण्याचीही तयारी केली जात आहे. अशा प्रकारे प्रस्तावित भारत दौऱ्यादरम्यान जनकपूरधाम-अयोध्या रेल्वेसेवा, पनौती पोलीस प्रशिक्षण संस्था, भैरहवा एकात्मिक तपासणी नाका आणि लुंबिनी बौद्ध विहार अशा चार प्रमुख प्रकल्पांच्या संयुक्त उद्घाटनाचा कार्यक्रम तयार केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande